बाकी साधन सुविधा पूर्ततेचे आव्हान

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

काही दिवसांपूर्वी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या साधन सुविधांच्या पूर्ततेसाठी ३० ऑगस्टपर्यंत कालावधी आवश्यक असल्याचे राज्य सरकारतर्फे भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) स्पर्धा तांत्रिक नियोजन समितीला कळविण्यात आले होते.

पणजी 

 कोविड-१९ मुळे गोव्यात या वर्षी नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे बाकी असलेल्या अपूर्ण साधन सुविधा मार्गी लावण्यासाठी आवश्यक वेळ संबंधित यंत्रणेला मिळेल.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या साधन सुविधेअंतर्गत सध्या कांपाल-पणजी येथील तरण तलाव प्रकल्प, फातोर्डा येथील टेनिस कोर्ट सुविधा, चिखली-वास्को येथील स्क्वॉश कोर्ट, पेडे-म्हापसा येथील हॉकीचे सदोष एस्ट्रो टर्फ मैदान आदी अपूर्णावस्थेत आहेत. हॉकी मैदानावरील अगोदरचे दोष असलेले एस्ट्रो टर्फ काढून नव्याने बसविणे आवश्यक आहे. कांपाल येथील तरण तलावाचे कामही पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहे. हल्लीच स्क्वॉश कोर्टवर छत आले, पण बाकी काम अपूर्ण असल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकल्यामुळे आणखी किमान वर्षभर स्पर्धा होणार नाही हे स्पष्ट आहे, असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या सूत्राने सांगितले. पुढील वर्षी टोकियो ऑलिंपिकनंतरच स्पर्धा घेण्याचे वेळापत्रक ठरू शकते. त्यामुळे अपूर्ण साधन सुविधा, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारला किमान एका वर्षाचा कालावधी मिळू शकतो, असे सूत्राने नमूद केले. कोरोना विषाणू महामारीमुळे राज्याची अर्थव्यवस्था डबघाईस आलेली आहे, त्यामुळे अतिरिक्त आर्थिक नियोजन करताना राज्य सरकारला कसरत करावी लागेल, असे स्थानिक आयोजन समितीच्या एका सदस्याने सांगितले.  

काही दिवसांपूर्वी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या साधन सुविधांच्या पूर्ततेसाठी ३० ऑगस्टपर्यंत कालावधी आवश्यक असल्याचे राज्य सरकारतर्फे भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) स्पर्धा तांत्रिक नियोजन समितीला कळविण्यात आले होते. जून ते सप्टेंबर या राज्यातील नियोजित पावसाळी कालावधी लक्षात घेता, ऑगस्टअखेपर्यंत सर्व सुविधा तयार करण्याचे मोठे आव्हान संबंधित यंत्रणेला पार पाडावे लागले असते, राष्ट्रीय स्पर्धा २० ऑक्टोबरला सुरू होणे अपेक्षित होते, त्यामुळे अपूर्ण साधन सुविधा पूर्ण होण्याबाबत साशंकताच होती, अखेरीस कोरोना विषाणू महामारी राष्ट्रीय स्पर्धा आयोजनाबाबत राज्य सरकारच्या मदतीस आल्याचे मानण्यास वाव मिळतो, असे ऑलिंपिक संघटनेचा पदाधिकारी म्हणाला.

संबंधित बातम्या