पणजी फुटबॉलर्सचा निसटता विजय

पणजी फुटबॉलर्सचा निसटता विजय
Chandans only goal against the Manora team was decisive

पणजी: चंदन गावस याने सामन्याच्या 48व्या मिनिटास केलेला गोल पणजी फुटबॉलर्ससाठी निर्णायक ठरला. त्या बळावर त्यांनी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत नवोदित यूथ क्लब ऑफ मनोरा संघावर 1-0 फरकाने निसटता विजय नोंदविला.

सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. पणजी फुटबॉलर्सचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने नमविले होते. दोन लढतीनंतर पणजीच्या संघाचे आता तीन गुण झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत मनोरा संघाला हार स्वीकारावी लागली.

गोलशून्य पूर्वार्धानंतर चंदनने लॉईड कार्दोझच्या असिस्टवर बरोबरीची कोंडी फोडली. यावेळी चेंडू अडविण्यासाठी गोलरक्षक लुईस बार्रेटोने आटोकाट प्रयत्न केले, पण त्याला यश मिळाले नाही. सामना संपण्यास तीन मिनिटे असताना लॉईडला पणजी फुटबॉलर्सची आघाडी वाढविण्याची संधी होती, पण मनोरा संघाचा बचाव भक्कम ठरला.

स्पर्धेत सोमवारी (ता. 8) वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबची गाठ साळगावकर फुटबॉल क्लबशी पडेल. सामना धुळेर-म्हापसा स्टेडियमवर होईल.

 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com