ISL 2020-21 : मोहिमेतील अखेरच्या लढतीत केरळा ब्लास्टर्सने चेन्नई एफसीला रोखले

दैनिक गोमन्तक
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

चेन्नईयीन एफसी संघाच्या सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेचा समारोप बरोबरीने झाला. दोन वेळच्या माजी विजेत्यांना केरळा ब्लास्टर्सने 1 - 1 गोलबरोबरीत रोखले.

पणजी : चेन्नईयीन एफसी संघाच्या सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेचा समारोप बरोबरीने झाला. दोन वेळच्या माजी विजेत्यांना केरळा ब्लास्टर्सने 1 - 1 गोलबरोबरीत रोखले.

सामना रविवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला. चेन्नईयीनला फात्खुलो फात्खुलोएव याने 10व्या मिनिटास आघाडी मिळवून दिल्यानंतर 29 व्या मिनिटास गॅरी हूपरने केरळा ब्लास्टर्सला पेनल्टी फटक्यावर बरोबरी साधून दिली. सामन्यातील 80 व्या मिनिटास एनेस सिपोविच याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले, त्यामुळे चेन्नईयीनला शेवटची दहा मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

ISL 2020-21 : पराभवामुळे माजी विजेत्या बंगळूरचे आव्हान संपुष्टात

चेन्नईयीनची ही 20 लढतीतील 11वी बरोबरी ठरली. त्यांचे 20 गुण आणि आठवा क्रमांक कायम राहिला. केरळा ब्लास्टर्सने 19 लढतीत आठवी बरोबरी नोंदविली. 17 गुणांसह ते अकराव्या क्रमांकावर घसरले आहेत.

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते. सामन्याच्या दहाव्या मिनिटास चेन्नईयीनचा ताजिकिस्तानी खेळाडू फात्खुलो फात्खुलोएव याने आयएसएल स्पर्धेतील वैयक्तिक पहिली गोल केला. एडविन व्हन्सपॉल याच्या असिस्टवर ताजिकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूने डाव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर गोलरक्षक आल्बिनो गोम्सला चकविले. नंतर केरळा ब्लास्टर्सच्या खेळाडूस मात देत हवेतील चेंडूवर ताबा राखण्याच्या प्रयत्नात पेनल्टी क्षेत्रात चेन्नईयीनच्या दीपक टांग्री याच्याकडून हँडबॉल झाला. रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केल्यानंतर गॅरी हूपरने अचूक फटका मारत केरळा ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली.

दृष्टिक्षेपात...

- फात्खुलो फात्खुलोएव याचा 16 आयएसएल सामन्यात 1 गोल

- गॅरी हूपर याचे मोसमातील 17 सामन्यांत 5 गोल

- यंदाच्या आयएसएलमध्ये चेन्नईयीनच्या सर्वाधिक 11 बरोबरी

- केरळा ब्लास्टर्सवर स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांकडून सर्वाधिक 34 गोल

- पहिल्या टप्प्यात उभय संघांत 0-0 बरोबरी

 

संबंधित बातम्या