आयपीएल 2020: पंजाबच्या 'किंग्स'वर चेन्नईचे 'सुपर किंग्स' भारी..

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

पंजाबला प्ले ऑफच्या आशा राखण्यासाठी विजयासह धावगती उंचावण्याचे आव्हान होते, पण राहुल आणि मयांक अगरवालला आक्रमक सुरुवातीचा पुरेसा फायदा घेता आला नाही. त्यातच हे दोघे बाद झाल्यावर दीपक हुडाची आक्रमकता सोडल्यास त्यांना काही साधले नाही.

अबु धाबी-  भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी बढती देण्यात आलेला केएल राहुल आपल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघास आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवून देण्यास अपात्र ठरला. स्पर्धेतील आव्हान संपलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने पंजाबचे आव्हान साखळीतच आटोपले. 

पंजाबला प्ले ऑफच्या आशा राखण्यासाठी विजयासह धावगती उंचावण्याचे आव्हान होते, पण राहुल आणि मयांक अगरवालला आक्रमक सुरुवातीचा पुरेसा फायदा घेता आला नाही. त्यातच हे दोघे बाद झाल्यावर दीपक हुडाची आक्रमकता सोडल्यास त्यांना काही साधले नाही. फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने भक्कम पाऊणशतकी सलामी देऊन गोलंदाजांच्या जोरावर विजय मिळवण्याच्या पंजाबच्या अपेक्षांना धक्का दिला. चेन्नईने ही लढत नऊ विकेट आणि सात चेंडू राखून जिंकली. 
दीपक हुडा दोनशेच्या स्ट्राईक रेटने नाबाद अर्धशतक करीत असताना त्याचे सहकारी चेंडूस धावही करीत नव्हते.

भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी बढती दिलेला राहुल मोक्‍याच्यावेळी पंजाब संघाच्या मदतीस धावून आला नाही. १ बाद ६२ वरून पंजाबची अवस्था ४ बाद ७२ झाली, त्यानंतर दीपकनेच संघास दीडशेच्या पार नेले. ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा भक्कम अर्धशतकी खेळी केली, फाफ डू प्लेसिसने आक्रमकता दाखवली. या परिस्थितीत षटकामागे साडेसात धावांचे लक्ष्य चेन्नईच्या सहज आवाक्‍यात आले नसते तरच नवल. पाच विजयाने आव्हान निर्माण केलेल्या पंजाबला अखेर मोक्‍याच्यावेळी दोन पराभवांचा फटका बसला. 
 

संबंधित बातम्या