जाता जाता चेन्नई एक्सप्रेस आली ट्रॅकवर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारली, हे आव्हान चेन्नईने आठ चेंडू राखून पार केले.

दुबई- आयपीएलच्या प्लेऑफसाठी आपली दावेवारी अधिक भक्कम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराट कोहलीच्या बंगळूर संघाला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई संघाने ब्रेक लावला. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्या शानदार अर्धशतकाच्या (नाबाद ६५) जोरावर चेन्नईने आज आठ विकेटने विजय मिळवला. या विजयाच्या चेन्नई संघाला फारसा फरक पडणार नाही.

विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळूरने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४५ धावांपर्यंत मजल मारली, हे आव्हान चेन्नईने आठ चेंडू राखून पार केले. या पराभवानंतर बंगळूरचा संघ गुणतक्‍त्यात तिसऱ्या, तर चेन्नई तळाच्या स्थानी कायम राहिले.  

ऋतुराज चमकला

बंगळूरकडून विराट कोहली आणि एबी डिव्हिल्यर्स यांनी अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला; परंतु त्यांना धावांचा वेग वाढवता आला नाही, परिणामी त्यांची धावसंख्या मर्यादित राहिली. या तुलनेत चेन्नईकडून फाफ डुप्लेसीबरोबर वेगवान सलामी देऊन भक्कम पायाभरणी केल्यानंतर ऋतुराजने धावांचा वेग कायम ठेवला, त्यामुळे त्यांच्यावर धावांचे दडपण आले नाही. 

अंबाती रायडूनेही २७ चेंडूत ३९ धावांचा तडाखा देत ऋतुराजवरील भार अधिक हलका केला. 
बंगळूरची सावध सुरुवात देवदत्त पदिक्कल आणि ॲरॉन फिन्च या बंगळूरच्या सलामीवीरांनी चार षटकांत ३१ धावांची बऱ्यापैकी सलामी दिली. जम बसल्यावर हे दोघेही फलंदाज बाद झाले; परंतु बंगळूरला त्याची चिंता नव्हती. कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिल्यर्स स्फोटक नसली तरी वेगवान फलंदाजी करत होते. दोघांचाही स्ट्राईक रेट शंभरच्या पुढे होता. १८ व्या षटकापर्यंत हे दोघे अनुभवी फलंदाज मैदानात होते, बंगळूरच्या खात्यात १२८ धावा जमाही झाल्या होत्या. त्यामुळे पुढच्या षटकांत धावांचा वेग वाढणे अपेक्षित होते,परंतु त्यानंतर त्यांच्या फलंदाजीला ब्रेक लागला.

विराटकडून एकच चौकार

डिव्हिल्यर्स उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला, त्यानंतर मोईन अलीनेही तीच चूक केली. विराटने अर्धशतकी खेळी केली. त्यासाठी त्याने ४३ चेंडू घेतले, परंतु अवघा एकच चौकार त्याला मारता आला. 
 

संबंधित बातम्या