चेन्नईचे 'आयपीएल'मधील भवितव्य आज ठरणार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील आव्हान जवळपास संपल्याचे मान्य केले होते, पण उर्वरित चारही लढती जिंकल्यास चेन्नईचे १४ गुण होतील आणि त्यांना आगेकूच करण्याची आशा असेल.

शारजा- आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला सहज पराजित करीत जोषात सुरुवात केली होती, पण आता दोन संघांत परतीची लढत होत आहे, त्या वेळी चेन्नई स्पर्धेतील प्ले ऑफच्या धूसर आशा कायम राखण्यासाठी झगडत आहे; तर मुंबई प्ले ऑफमध्येही हुकुमत गाजवण्यासाठी पूर्वतयारी करीत आहे.

राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील आव्हान जवळपास संपल्याचे मान्य केले होते, पण उर्वरित चारही लढती जिंकल्यास चेन्नईचे १४ गुण होतील आणि त्यांना आगेकूच करण्याची आशा असेल. गेल्या दोन मोसमांतील प्रभावी कामगिरीनंतर आमची क्षमता संपली आहे, असे चेन्नईचे मार्गदर्शक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले होते. अनुभवी खेळाडूंवर जास्त भर दिल्याचा फटका बसत असल्याची कबुलीच त्यांनी दिली होती.

अपयशाच्या गर्तेत फसलेल्या चेन्नईची बाजू द्वेनी ब्राव्होच्या दुखापतीमुळे जास्तच कमकुवत झाली आहे. आता या परिस्थितीत चेन्नई नवोदितांना जास्त संधी देण्याचा प्रयोग करणार का, याकडे लक्ष आहे. केदार जाधवऐवजी एन. जगदीशन किंवा ऋतुराज गायकवाडला संधी देण्याबाबत विचार होत आहे.

प्रयोगासाठी चेन्नईकडे फारसा वेळ नाही. त्यातच बहरात असलेल्या मुंबईविरुद्ध कोणीही प्रयोग करणे टाळेलच, पण आव्हान जवळपास संपलेले असताना चेन्नई या सामन्यापासून नवोदितांना संधी देणार का याकडे लक्ष आहे. 

गोलंदाजांसाठी प्रतिकूल असलेल्या शारजातील लहान स्टेडियमवर मुंबईचे स्फोटक फलंदाज धावांची बरसात करण्यास उत्सुक असतील. रोहित शर्मा, इशान किशनला पुन्हा बहरात येण्याची चांगली संधी आहे. कृणाल पंड्याने आपण डाव सावरण्याचे काम करू शकतो हे दाखवले आहे. गोलंदाजांचे भक्कम पाठबळ फलंदाजांचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावत आहे.
 

संबंधित बातम्या