ईस्ट बंगाल अजूनही विजयाच्या शोधात

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

कोलकात्याचा संघ अजूनही विजयाच्या शोधात आहे, तर चेन्नईयीन एफसी संघही पूर्ण तीन गुणांसाठी प्रयत्नशील असेल.

पणजी:  ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी यांच्यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (ता. 26) होणारा सामना रंगतदार होण्याचे संकेत आहेत. कोलकात्याचा संघ अजूनही विजयाच्या शोधात आहे, तर चेन्नईयीन एफसी संघही पूर्ण तीन गुणांसाठी प्रयत्नशील असेल.

बॉक्सिंग डे लढत वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. इंग्लंडचे रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालने मागील तीन सामन्यात चमकदार खेळ केला, पण त्यांना विजयाने हुकलावणी दिली. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध इंज्युरी टाईम खेळातील चौथ्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे त्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. आयएसएल स्पर्धेत पदार्पण करणारा संघ अजूनही विजयाविना आहे. सहा लढतीत दोन बरोबरी आणि चार पराभवामुळे खाती फक्त दोन गुण असल्यामुळे ईस्ट बंगाल संघ तळाच्या अकराव्या क्रमांकावर आहे. त्यांनी सर्वांत कमी 3 गोल नोंदविले असून सर्वाधिक 11 गोल स्वीकारले आहेत.

``शेवटच्या मिनिटास गोल स्वीकारल्यामुळे आम्ही कमनशिबी ठरलो, पण खेळाडू छान खेळले आणि आम्ही खूप वेळा संधी निर्माण केल्या. आम्ही तो सामना आरामात जिंकायला हवा होता, पण फुटबॉल याचप्रमाणे असते,`` असे फावलर केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या लढतीविषयी म्हणाले. खेळाडूंनी निराशा झटकली असून मनोबल उंचावले असल्याचा दावा त्यांनी केला.

हंगेरीयन साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीने मागील लढतीत एफसी गोवास हरविले, त्यामुळे त्याचा विश्वास निश्चितच उंचावलेला असेल. मोहिमेतील पहिल्या लढतीत जमशेदपूरला हरविल्यानंतर दोन वेळचा माजी विजेता संघ चार लढती विजय मिळवू शकला नव्हता. शनिवारी ईस्ट बंगालला नमवून गुणतक्त्यातील स्थान सुधारण्याचे त्यांचे लक्ष्य राहील. सध्या चेन्नईयीनच्या खाती आठ गुण आहेत. सहा लढतीत प्रत्येकी दोन विजय, बरोबरी आणि पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. एफसी गोवाविरुद्ध शानदार खेळ केलेल्या राफेल क्रिव्हेलारो याच्यावर चेन्नईयीनची जास्त मदार राहील, तर ईस्ट बंगालला धोका असेल.

लाझ्लो यांच्यानुसार ईस्ट बंगालविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी खडतर असेल. ``ते नवे आहेत, तरीही त्यांनी परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. आम्हाला चांगल्या प्रकारे एकाग्रता साधावी लागेल आणि खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल,`` असे लाझ्लो म्हणाले.

दृष्टिक्षेपात...

  • - आयएसएलच्या सातव्या मोसमात चेन्नईयीनचे 5, तर ईस्ट बंगालचे 3 गोल
  • - स्पर्धेत ईस्ट बंगालवर प्रतिस्पर्ध्यांचे सर्वाधिक 11 गोल
  • - चेन्नईयीसाठी यंदा 5 वेगवेगळ्या खेळाडूंचे गोल
  • - चेन्नईयीनची 2, तर ईस्ट बंगालची 1 लढतीत क्लीन शीट

संबंधित बातम्या