चेन्नईयीनची ओडिशाविरुद्ध पुन्हा कसोटी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

काही दिवसांपूर्वी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ओडिशा एफसीने गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चेन्नईयीन एफसीची पुन्हा कसोटी लागेल.

पणजी : काही दिवसांपूर्वी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ओडिशा एफसीने गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर याच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चेन्नईयीन एफसीची पुन्हा कसोटी लागेल.

सामना बुधवारी (ता. 13) बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर खेळला जाईल. चेन्नईयीनचे सध्या 11, तर ओडिशाचे सहा गुण असून दोन्ही संघ प्रत्येकी १० सामने खेळले आहेत.

साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसी संघ अजूनही चाचपडताना दिसत आहे. गेल्या रविवारी त्यांना तळाच्या स्थानावरील ओडिशा एफसीने चांगलेच सतावले होते. दिएगो मॉरिसियो याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे चेन्नईचा संघ बचावला होता. ब्राझीलियन राफेल क्रिव्हेलारो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे, त्याच्या जागी चेन्नईयीनने स्पॅनिश मध्यरक्षक मान्युएल लान्झारोते याला करारबद्ध केले आहे, पण तो ओडिशाविरुद्ध खेळण्याची शक्यता नाही. ओडिशाविरुद्ध चेन्नईयीनच्या रहीम अली व याकुब सिल्व्हेस्टर यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी गमावल्या होत्या, प्रशिक्षकांना या त्रुटीवर तोडगा काढावा लागेल.

स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशाने मागील काही सामन्यांत उल्लेखनीय खेळ केला आहे. चेन्नईयीनला गोलशून्य बरोबरीत रोखण्यापूर्वी त्यांनी केरळा ब्लास्टर्सलाही नमविले होते. याशिवाय नॉर्थईस्ट युनायटेडलाही त्यांनी गोलशून्य बरोबरीत रोखले, साहजिकच भुवनेश्वर येथील संघ बुधवारी चेन्नईयीनला धक्का देण्यासाठी इच्छुक असेल.

 

दृष्टिक्षेपात....

  • - ओडिशा व चेन्नईयीन यांच्यात पहिल्या टप्प्यात 0-0 बरोबरी
  • - ओडिशा एफसीच्या दिएगो मॉरिसियो याचे स्पर्धेत 5 गोल
  • - ओडिशाच्या मागील 4 लढतीत 1 विजय, 2 बरोबरी, 1 पराभव
  • - चेन्नईयीनच्या मागील 4 लढतीत 3 बरोबरी, 1 पराभव
  • - चेन्नईयीनच्या स्पर्धेत 4, तर ओडिशाची 1 क्लीन शीट

संबंधित बातम्या