चेन्नईयीनच्या मदतीस पेनल्टी गोल; हैदराबादवर एका गोलने निसटती मात

दोन वेळच्या माजी विजेत्यांनी हैदराबाद एफसीला (Hyderabad FC) 1-0 फरकाने हरविले.
चेन्नईयीनच्या मदतीस पेनल्टी गोल; हैदराबादवर एका गोलने निसटती मात
Chennaiyin FCDainik Gomantak

पणजी : सामन्याच्या उत्तरार्धात व्लागिमिर कोमन याने नोंदविलेल्या पेनल्टी गोलच्या बळावर चेन्नईयीन एफसीने (Chennaiyin FC) इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमातील मोहिमेची सुरवात विजयाने केली. दोन वेळच्या माजी विजेत्यांनी हैदराबाद एफसीला (Hyderabad FC) 1-0 फरकाने हरविले. सामना मंगळवारी बांबोळी येथील एथलेटिक्स स्टेडियमवर झाला. माँटेनेग्रोचे बोझिदार बँडोविच यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेन्नईयीनला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाले. गतमोसमात आयएसएल स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळालेल्या मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद संघाला पेनल्टीवर गोल स्वीकारल्यामुळे निराश व्हावे लागले.

गोलशून्य पूर्वार्धानंतर चेन्नईयीन एफसीला पेनल्टी फटका मिळाला. हंगेरीयन आघाडीपटू व्लागिमिर कोमन याने 66व्या मिनिटास फटका अचूक मारत आयएसएल स्पर्धेतील पदार्पण साजरे केले. त्याच्या फटक्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला अजिबात अंदाज आला नाही. हैदराबादच्या हितेश शर्माने चेन्नईयीनचा कर्णधार अनिरुद्ध थापा याला गोलक्षेत्रात केलेले टॅकल माजी विजेत्यांच्या पथ्यावर पडले. त्यापूर्वी विश्रांतीनंतर चौथ्या मिनिटास एदू गार्सिया याचा गोल ऑफसाईड ठरल्यामुळे हैदराबादला आघाडीस मुकावे लागले होते. गार्सियाने गोल केला तेव्हा हैदराबादचा चिंग्लेन्साना सिंग ऑफसाईड असल्याचे रेफरीच्या नजरेतून निसटले नाही.

Chennaiyin FC
पावसामुळे फक्त दोन चेंडूंचाच खेळ

ओडिशा-बंगळूर सामना आज

वास्को येथील टिळक मैदानावर बुधवारी ओडिशा एफसी व बंगळूर एफसी यांच्यात सामना खेळला जाईल. मार्को पेझ्झैयोली यांच्या मार्गदर्शनाखालील बंगळूरने पहिल्या लढतीत नॉर्थईस्ट युनायटेडवर 4-2 फरकाने मात केली, त्यामुळे त्यांच्या खाती तीन गुण आहेत. स्पॅनिश किको रमिरेझ यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा संघाचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. गतमोसमात फक्त दोन सामने जिंकलेल्या ओडिशाला तळाचे 11वे स्थान मिळाले होते.

दृष्टिक्षेपात...

- चेन्नईयीनचा हंगेरीयन आघाडीपटू व्लागिमिर कोमन याचा पहिल्याच आयएसएल लढतीत गोल

- गतमोसमातील दोन्ही लढतीत हैदराबादची चेन्नईयीनवर मात, मात्र यंदा पराभव

- यंदा आयएसेलमधील 5 सामन्यात 18 गोल, पेनल्टीवर 3

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com