क्रिव्हेलारोमुळे चेन्नईयीन एफसी वरचढ ; 'आयएसएल'मध्ये एफसी गोवाचा सलग दुसरा पराभव

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

ब्राझीलियन मध्यरक्षक आणि संघाचा कर्णधार राफेल क्रिव्हेलारो याच्या प्रेक्षणीय खेळाच्या बळावर चेन्नईयीन एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल एफसी गोवास 2-1 फरकाने हरविले.

पणजी :  ब्राझीलियन मध्यरक्षक आणि संघाचा कर्णधार राफेल क्रिव्हेलारो याच्या प्रेक्षणीय खेळाच्या बळावर चेन्नईयीन एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत काल एफसी गोवास 2-1 फरकाने हरविले. गोव्यातील संघाचा सलग दुसरा पराभव ठरला. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झाला. चेन्नईयीनसाठी कर्णधार ब्राझीलियन राफेल क्रिव्हेलारो याने थेट कॉर्नर किकवर पाचव्या मिनिटास पहिला गोल केला. नंतर 53व्या मिनिटास क्रिव्हेलारोच्या असिस्टवर बदली खेळाडू 20 वर्षीय रहीम अली याने दोन वेळच्या माजी विजेत्यांना पुन्हा आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या नवव्या मिनिटास स्पॅनिश मध्यरक्षक जोर्जे ओर्तिझ याने एफसी गोवास बरोबरी साधून दिली होती. क्रिव्हेलारो सामन्याचा मानकरी ठरला.

 

चेन्नईयीनचा हा सहा लढतीतील दुसरा विजय ठरला. साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे आठ गुण झाले आहेत. एकंदरीत तिसऱ्या पराभवामुळे ज्युआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाचे आठ गुण कायम राहिले. समान गुण असले, तरी गोलसरासरीत एफसी गोवा सातव्या, तर चेन्नईयीन आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नईयीनने काही सोप्या संधी गमावल्या नसत्या, तर त्यांना याहून मोठा विजय नोंदविता आला असता. त्यांचा लाल्लियानझुआला छांगटे नेटसमोरून फटका मारताना एकाग्रतेत कमी पडला. एफसी गोवाचा गोलरक्षक महंमद नवाज यानेही काही फटके चांगले रोखले. एफसी गोवाचा बचाव प्रतिस्पर्ध्यांच्या नियोजनबद्ध खेळासमोर फिका ठरला. स्पर्धेत सहा गोल केलेल्या एफसी गोवाच्या इगोर आंगुलो याला चेन्नईयीनच्या बचावपटूंनी मोकळीक दिली नाही.

 

नऊ मिनिटांत दोन गोल

सामन्याची सुरवात सनसनाटी ठरली. चेन्नईयीनचा कर्णधार ब्राझीलियन मध्यरक्षक राफेल क्रिव्हेलारो याने पाचव्याच मिनिटास डाव्या पायाच्या सणसणीत कॉर्नर किकवर संघाचे गोलखाते उघडले. त्यानंतर चार मिनिटांनी मध्यरक्षक जोर्जे ओर्तिझने चेंडूवर ताबा राखत चेन्नईयीनच्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि उजव्या बाजूने असलेल्या अलेक्झांडर रोमारियो जेसूराज याच्या ताब्यात चेंडू दिला. तमिळनाडूतील दिंडीगुल येथील खेळाडूने  गोलक्षेत्रात दाखल झालेल्या ओर्तिझकडे पुन्हा चेंडू सोपविला. यावेळी स्पॅनिश खेळाडूने डाव्या पायाच्या वेगवान फटक्यावर गोलरक्षक विशाल कैथला हतबल ठरविले.

 

चेन्नईयीनची आघाडी

कर्णधार राफेल क्रिव्हेलारो याने एफसी गोवाचा बचाव कमजोर ठरविताना आपल्या मार्करला चकवा देत रहीम अली याला शानदार क्रॉस पास दिला. यावेळी बदली खेळाडूने नेटच्या अगदी जवळून एफसी गोवाचे बचावपटू आणि गोलरक्षक नवाज याला गुंगारा देत चेन्नईच्या संघास आघाडी मिळवून दिली. एफसी गोवाने यंदाच्या मोसमात स्वीकारलेला हा नववा गोल ठरला. विश्रांतीनंतरच्या पहिल्याच मिनिटास दीपक टांग्री याच्या जागी रहीम मैदानात उतरला होता.

 

दृष्टिक्षेपात...

- एफसी गोवाचा मध्यरक्षक जोर्जे ओर्तिझ याचे यंदा 2 गोल

- चेन्नईयीनचा ब्राझीलियन मध्यरक्षक राफेल क्रिव्हेलारो याचा यंदा पहिलाच, तर 25 आयएसएल सामन्यात 8 गोल

- राफेल क्रिव्हेलारोचे एफसी गोवाविरुद्ध 3 गोल, गतमोसमात चेन्नई येथे 2 गोल

- चेन्नईयीनचा 20 वर्षीय आघाडीपटू रहीम अली याचा 9 सामन्यात पहिला गोल

- एफसी गोवाविरुद्धच्या 18 आयएसएल लढतीत चेन्नईयीनचे 8 विजय, एफसी            गोवाचे 9 विजय, तर 1 बरोबरी

 

संबंधित बातम्या