चेन्नईयीन तिसऱ्यांदा इंडियन सुपर लीग जिंकणार ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा दोन वेळा जिंकलेला चेन्नईयीन एफसी संघ यंदा तिसऱ्या विजेतेपदाच्या शर्यतीत असेल. संघाचे नवे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ विजेता ठरल्यास विक्रमाशी बरोबरी साधेल.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा दोन वेळा जिंकलेला चेन्नईयीन एफसी संघ यंदा तिसऱ्या विजेतेपदाच्या शर्यतीत असेल. संघाचे नवे प्रशिक्षक साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ विजेता ठरल्यास विक्रमाशी बरोबरी साधेल.

चेन्नईयीन एफसी २०१९-२० मोसमाच्या अंतिम लढतीत एटीके एफसीविरुद्ध पराभूत झाला होता. गतमोससमातील उपविजेतेपदानंतर चेन्नईच्या संघाने बदल अनुभवले आहे. प्रशिक्षक ओवेन कॉयल यांनी जमशेदपूर संघाची सूत्रे स्वीकारली, तर गोल्डन बूट मानकरी नेरियस व्हॅल्सकिसही त्याच संघात दाखल झाला 
आहे.

चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर ५६ वर्षीय साबा यांनी नव्या परदेशी खेळाडूंच्या निवडीचे आव्हान स्वीकारले. समाधानाची बाब म्हणजे, चेन्नईयीनने आगामी मोसमासाठी भारतीय खेळाडू राखण्यात यश मिळविले. ब्राझीलियन मध्यरक्षक राफेल क्रिव्हेलारो याला संघात कायम ठेवणे मरिना मचान्स संघासाठी महत्त्वपूर्ण आहे. गतमोसमात त्याने सात गोल व आठ असिस्टची नोंद केली होती. भारतीय खेळाडूंत लाल्लियानझुआला छांगटे याला क्रिव्हेलारो यांच्यामुळे आक्रमक खेळाची संधी लाभेल. 

व्हॅल्सकिस याची अनुपस्थिती जाणवू नये या साठी लाझ्लो यांनी आक्रमणात अनुभवी एस्माईल गोन्साल्विस आणि याकूब सिल्व्हेस्टर यांनाही सामावून घेतले आहे. ब्राझीलियन मध्यरक्षक मेमो मौरा भारतातील पाचवा मोसम खेळताना चेन्नईयीन संघात दाखल झाला आहे. त्याच्यासह मध्यफळीत अनिरुद्ध थापा, जर्मनप्रीत सिंग, एडविन वन्सपॉल यांच्यावर चेन्नईच्या संघाची मदार राहील. 
बचावफळीत ब्राझीलियन एली साबिया हा हुकमी खेळाडू असेल. मात्र गतमोसमातील सहकारी लुसियान गोईयान यंदा त्याला साथ देण्यासाठी नसेल. साबियाला बचावफळीत एनेस सिपोविच, रीगन सिंग, जेरी लालरिनझुआला यांच्यासह प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण रोखावे लागेल. एकंदरीत चेन्नईयीन एफसी संघ समतोल संभवतो. 

संबंधित बातम्या