ख्रिस गेलचे शतक हुकले; पंजाबलाही पराभवाचा धक्का

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

नजरेचे पारणे फेडणारी आक्रमक खेळी करणाऱ्या ख्रिस गेलचे शतक हुकले आणि त्याच्या पंजाब संघाला मोठी धावसंख्या उभारुनही पराभवचा धक्का सहन करावा लागला.

अबुधाबी :  नजरेचे पारणे फेडणारी आक्रमक खेळी करणाऱ्या ख्रिस गेलचे शतक हुकले आणि त्याच्या पंजाब संघाला मोठी धावसंख्या उभारुनही पराभवचा धक्का सहन करावा लागला. राजस्थान रॉयल्सने सात विकेटने विजय मिळवत आयपीएलच्या प्लेऑफमधील आशा कायम ठेवल्या. 
सलग पाच विजय मिळवून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केलेल्या पंजाबच्या गाडीला आज मात्र ब्रेक लागला. गेलच्या ९९ धावांमुळे त्यांनी १८५ धावा केल्या, पण बेन स्टोक्‍स (५०) संजू सॅमसन (४८) यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थानची सरशी झाली.

स्टोक्सचे पुन्हा आक्रमण
मुंबईविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या स्टोक्‍सने आजही तिच खेळी पुढे सुरू ठेवावी अशा थाटात सुरुवात केली त्यामुळे धावांच्या पाठलागात राजस्थानचा संघ कायम होता. सॅमसन धावचीत झाल्यावर थोडे दडपण आले होते, परंतु स्टीव स्मिथने विजय साकार केला. १७.३ षटकांतच त्यांनी हे आव्हान पार केले.

गेलचा तडाखा
पंजाबच्या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर मनदीप सिंग आज मात्र भोपळाही फोडू शकला नाही. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर बेन स्टोक्‍सने त्याचा अप्रतिम झेल टिपला, या पहिल्या झटक्‍याचा पंजाबच्या फलंदाजीवर काहीच परिणाम झाला नाही. जणू काही गेलचे वादळ स्टेडियमवर आले होते. राजस्थानच्या गोलंजांवर तो तुटून पडला. सहा चौकार आणि आठ षटकारांची आतषबाजी त्याने केली.  दूर्दैवाने त्याचे शतक एका धावाने हुकले. आर्चरनेच त्याला बाद केले. ऑरेंज कॅप स्वतःकडेच कायम ठेवणाऱ्या केएल राहुलने ४६ धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त इतरांना हातभार लावता आले नाही.
 

संबंधित बातम्या