चर्चिल ब्रदर्सचे आय-लीग तिसऱ्यांदा जिंकण्याचे लक्ष्य ; एकमेव गोमंतकीय संघ

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळताना चर्चिल ब्रदर्स संघाचे तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याचे लक्ष्य असेल, त्या दृष्टीने त्यांनी सरावास सुरवात केली असून नवे प्रशिक्षक स्पॅनिश फर्नांडो सांतियागो व्हारेला यांच्या अनुभवावर संघाची भिस्त राहील.

पणजी : आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत खेळताना चर्चिल ब्रदर्स संघाचे तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्याचे लक्ष्य असेल, त्या दृष्टीने त्यांनी सरावास सुरवात केली असून नवे प्रशिक्षक स्पॅनिश फर्नांडो सांतियागो व्हारेला यांच्या अनुभवावर संघाची भिस्त राहील.

कोलकात्यात जैवसुरक्षा वातावरणात आणि रिकाम्या स्टेडियमवर ९ जानेवारीपासून यंदाची आय-लीग स्पर्धा खेळली जाईल. चर्चिल ब्रदर्स हा स्पर्धेतील एकमेव गोमंतकीय संघ आहे. त्यांनी यापूर्वी दोन वेळा स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स संघ पोर्तुगालच्या बर्नार्डो तावारिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला होता. सुरवातीच्या प्रभावी निकालानंतर स्पर्धेच्या उत्तरार्धात वार्का येथील संघाच्या कामगिरीत घसरण झाली, त्यामुळे तावारिस यांना डच्चू देण्यात आला होता. कोरोना विषाणू महामारीमुळे अर्धवट राहिलेल्या गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सने २० गुणांसह आठवा क्रमांक मिळविला होता.

नव्या मोसमासाठी सहाय्यक प्रशिक्षक मातेस कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चिल ब्रदर्सने असोल्णे येथील मैदानावर सरावास सुरवात केली आहे. स्पेनमधून दाखल झालेले व्हारेला विलगीकरण संपवून पुढील आठवड्यात मुख्य प्रशिक्षक या नात्याने सूत्रे हाती घेण्याची माहिती आहे. व्हारेला गतमोसमात गोकुळम केरळा संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केरळच्या संघाने ड्युरँड कप जिंकला होता. आगामी आय-लीग स्पर्धेसाठी परदेशी खेळाडू करारबद्ध केले आहेत. यामध्ये स्लोव्हानियाचा लुका मेसेन व होंडुरासचा क्लेविन झुनिगा हे आघाडीपटू, तसेच गतमोसमात रेयाल काश्मीरकडून खेळलेला आयव्हरी कोस्टचा मध्यरक्षक बॅझी आर्मांद गोव्यातील संघाकडून खेळेल. चर्चिल ब्रदर्सचे परदेशी खेळाडू अजून गोव्यात दाखल झालेले नाहीत. 

दोन वेळा विजेतेपद
चर्चिल ब्रदर्सने २००८-०९ आणि २०१२-१३ असे दोन वेळा आय-लीग स्पर्धा जिंकली आहे. २००७-०८, २००९-१० मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

संबंधित बातम्या