I-League : झुनिगाच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सचा नेरोका एफसीवर निसटती मात

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुन्हा अग्रस्थान मिळविताना चर्चिल ब्रदर्सने बुधवारी मणिपूरच्या नेरोका एफसीवर 1 - 0 फरकाने निसटती मात केली.

पणजी : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुन्हा अग्रस्थान मिळविताना चर्चिल ब्रदर्सने बुधवारी मणिपूरच्या नेरोका एफसीवर 1 - 0 फरकाने निसटती मात केली. होंडुरासचा आंतरराष्ट्रीय खेळाडू क्लेव्हिन झुनिगा याने पूर्वार्धात नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.

कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर झालेल्या लढतीत झुनिगा याने सामन्याच्या 16 व्या मिनिटास गोल केला. किंग्सली फर्नांडिसच्या असिस्टवर झुनिगाने गोलक्षेत्रात धाव घेत प्रतिस्पर्धी गोलरक्षक बिशोर्जित सिंग याला चकविले.

ISL 2020-21 : जमशेदपूरला सहाव्या क्रमांकासाठी बंगळूरचे आव्हान

स्पर्धेत अपराजित असलेल्या चर्चिल ब्रदर्सचा हा नऊ लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 19 गुण झाले असून रियल काश्मीरला दुसऱ्या स्थानी ढकलताना दोन गुणांची आघाडी घेतली आहे. नेरोका एफसीला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे आठ गुण कायम राहिले.

फर्नांडो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चिल ब्रदर्सचे आजच्या विजयामुळे आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पहिल्या सहा संघात कायम राहील हे स्पष्ट झाले.

 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत 5 विजय, 4 बरोबरी

- नेरोका एफसीचे 2 विजय, 2 बरोबरी, 5 पराभव

- क्लेव्हिन झुनिगा याचे स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल

- चर्चिल ब्रदर्सचे नेरोका एफसीवर सलग 2 विजय

- गतमोसमात 4-1 फरकाने मात

संबंधित बातम्या