Goa Professional League : राकेशच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने पणजी फुटबॉलर्सला एका गोलने नमविले

दैनिक गोमन्तक
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना चर्चिल ब्रदर्सने बुधवारी पणजी फुटबॉलर्सवर मात केली.

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना चर्चिल ब्रदर्सने बुधवारी पणजी फुटबॉलर्सवर मात केली. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर गतवेळच्या संयुक्त विजेत्या संघाने 1 - 0 फरकाने निसटता विजय मिळविला.

सामन्यातील एकमेव गोल चर्चिल ब्रदर्सच्या राकेश दास याने 41 व्या मिनिटास नोंदविला. चर्चिल ब्रदर्सच्या महंमद शाहसाद याचा फटका पणजी फुटबॉलर्सचा अक्रम यादवाड व्यवस्थिपणे रोखू शकला नाही, त्याचा लाभ उठवत राकेशने प्रतिस्पर्धी गोलरक्षक प्रेस्टन रेगो याला चकवून संघाला आघाडी मिळवून दिली.

ISL 2020-21 : तळातील ओडिशाची गाठ केरळा ब्लास्टर्सशी

पणजी फुटबॉलर्सला गोल करण्याच्या चांगल्या संधी होत्या, परंतु सदोष नेमबाजीमुळे त्यांचे खूपच नुकसान झाले. उत्तरार्धात वाल्मिकी मिरांडा याचा धोकादायक प्रयत्न गोलरक्षक देबनाथ याने उधळून लावल्यामुळे चर्चिल ब्रदर्सची आघाडी अबाधित राखली. जॉयसन गांवकार याने वेळोवेळी नेम चुकविल्यामुळे पणजी फुटबॉलर्स पिछाडी भेदता आली नाही.

चर्चिल ब्रदर्सचे आता तीन लढतीनंतर तीन गुण झाले असून त्यांनी तळाचे स्थान टाळले आहे. पणजी फुटबॉलर्सचा हा दुसरा पराभव ठरला. त्यामुळे तीन लढतीनंतर त्यांचे तीन गुण कायम आहेत. स्पर्धेत गुरुवारी (ता. 11) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर यूथ क्लब मनोरा व गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब यांच्यात सामना होईल.

संबंधित बातम्या