आय-लीग : चर्चिल ब्रदर्ससाठी क्लेव्हिनचा गोल निर्णायक

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

होंडुरासचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा याने सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना केलेल्या गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने मंगळवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाचे पूर्ण तीन गुण वसूल केले.

पणजी : होंडुरासचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा याने सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना केलेल्या गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने मंगळवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाचे पूर्ण तीन गुण वसूल केले. त्यांनी पंजाब फुटबॉल क्लबवर 1 - 0 फरकाने निसटती मात केली.

सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झाला. झुनिगा याने सामन्याच्या 85 व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. चर्चिल ब्रदर्सचा हा तीन लढतीतील दुसरा विजय ठरला. अन्य एका बरोबरीसह स्पर्धेत अपराजित असलेल्या गोव्याच्या संघाचे सध्या सर्वाधिक सात गुण झाले आहेत. पंजाब फुटबॉल क्लबला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे एका विजयासह तीन लढतीनंतर त्यांचे तीन गुण कायम आहेत.

इंडियन एरोजविरुद्ध चर्चिल ब्रदर्सच्या विजयात तीन गोल केलेल्या झुनिगा याचे आता स्पर्धेत चार गोल झाले आहेत. होंडुरासच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूने सहकाऱ्याकडून मिळालेल्या क्रॉस पासवर सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षकाचा बचाव भेदला. चर्चिल ब्रदर्सचा पुढील सामना 25 जानेवारी सुदेवा दिल्ली एफसी संघाविरुद्ध होईल.

 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सचे पंजाब एफसीवर सलग 2 विजय

- गतमोसमात चर्चिल ब्रदर्सची पंजाबवर 3 - 0 फरकाने मात

- क्लेविन झुनिगा याचे यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 4 गोल

संबंधित बातम्या