I League : चर्चिल ब्रदर्सचा `सुपर सब` फ्रेडसनच्या `इंज्युरी टाईम` गोलमुळे रियल काश्मीरवर विजय 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 मार्च 2021

सामन्याच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास बदली खेळाडू फ्रेडसन मार्शल याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान अबाधित राखले.

पणजी : सामन्याच्या इंज्युरी टाईममधील चौथ्या मिनिटास बदली खेळाडू फ्रेडसन मार्शल याने नोंदविलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान अबाधित राखले. गोव्याच्या संघाने शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील लढतीत रियल काश्मीरला 2-1 फरकाने हरविले.

सामना कोलकाता येथील  विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर झाला. स्लोव्हेनियन आघाडीपटू लुका मॅसेन याने 45+1 मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. नंतर उत्तरार्धातील खेळात रियल काश्मीरने बरोबरीचा गोल केला. लुकमन आदेफेमी याने 67व्या मिनिटास काश्मीरच्या संघास बरोबरी साधून दिली. फ्रेडसनने सामन्याच्या 90+4 मिनिटास दूरवरून मारलेल्या सणसणीत फटक्यावर चर्चिल ब्रदर्सच्या  विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला निर्धारित वेळेतील सहा मिनिटे बाकी असताना प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी बदली खेळाडू पाठविले होते.

पहिल्या टप्प्यात अपराजित राहिलेल्या चर्चिल ब्रदर्सचा हा स्पर्धेतील सातवा विजय ठरला. त्यांचे अन्य चार सामने बरोबरीत राहिले आहेत. चर्चिल ब्रदर्सचे आता 11 लढतीतून 25 गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील पंजाब एफसीवर त्यांनी सात गुणांची आघाडी प्राप्त केली आहे. रियल काश्मीरला स्पर्धेत दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे 11 लढतीनंतर 17 गुण आणि तिसरा क्रमांक कायम राहिला. 

INDvsENG 4th Test : पहिल्या डावात रिषभ पंत ठरला पुन्हा तारणहार  

चर्चिल ब्रदर्सने सामन्यावर सुरवातीपासूनच वर्चस्व राखले होते. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास त्यांच्या क्लेव्हिन झुनिगा याची संधी हुकली होती. त्यानंतर 35व्या मिनिटास झुनिगा प्रतिस्पर्धी गोलरक्षकास चकवा देऊ शकला नाही. पूर्वार्धाच्या इंज्युरी टाईममध्ये रियल काश्मीरचा बचावपटू हरून आमिरी याच्या चुकीमुळे चर्चिल ब्रदर्सला आघाडी घेणे शक्य झाले. चर्चिल ब्रदर्सच्या विनिल पुजारी याच्या फटक्यावर आमिरी नियंत्रण राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत मॅसेन याने लक्ष्य साधले.

उत्तरार्धात रियल काश्मीरने चर्चिल ब्रदर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी 54व्या मिनिटास बरोबरी साधली होती, पण चेस्टरपॉल लिंगडोह याचा गोल अवैध ठरविण्यात आला. त्यानंतर 57व्या  मिनिटास गोलरक्षक शिल्टन पॉल याने दक्ष राहत मेसन रॉबर्टसन याला प्रयत्न उधळल्यामुळे चर्चिल ब्रदर्सची आघाडी अबाधित राहिली. अखेर तासाभराच्या खेळानंतर काश्मीरच्या संघाने बरोबरी साधली. लुकमन याने जोरदार मुसंडी मारत चर्चिल ब्रदर्सचा बचाव भेदला आणि नंतर गोलरक्षक पॉल यालाही गुंगारा दिला. सामना बरोबरीत राहण्याची शक्यता असताना फ्रेडसनचा सणसणीत फटका भेदक ठरला आणि चर्चिल ब्रदर्सच्या खाती महत्त्वपूर्ण आघाडी जमा झाली.

 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेन याचे स्पर्धेत आता सर्वाधिक 8 गोल

- रियल काश्मीरच्या लुकमन आदेफेमी याचे स्पर्धेत 6 गोल

- फ्रेडसन मार्शल याचा मोसमात 1 गोल

- स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्स व रियल काश्मीर यांच्यात 0-0 बरोबरी

- चर्चिल ब्रदर्सचे स्पर्धेत 17, तर रियल काश्मीरचे 19 गोल

 

संबंधित बातम्या