आय-लीग : सामना जिंकण्याचे चर्चिल ब्रदर्सचे लक्ष्य

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे, सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध खेळतानाही पूर्ण गुणांचेच उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी रविवारी नमूद केले.

पणजी : चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील प्रत्येक सामना जिंकण्याचे लक्ष्य बाळगले आहे, सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध खेळतानाही पूर्ण गुणांचेच उद्दिष्ट्य असल्याचे त्यांनी रविवारी नमूद केले.

गोव्याचा चर्चिल ब्रदर्स व सुदेवा दिल्ली यांच्यातील आय-लीग सामना सोमवारी (ता. 25) कोलकाता येथील मोहन बागान मैदानावर खेळला जाईल. अपराजित कामगिरी नोंदवून चर्चिल ब्रदर्स सध्या तीन सामन्यांतील सात गुणांसह अव्वल स्थानी आहे. तिसऱ्या फेरीतील लढतीत त्यांनी पंजाब एफसीवर एका गोलने मात केली होती. आय-लीग स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या सुदेवा एफसीने मागील लढतीत दमदार रियल काश्मीरला बरोबरीत रोखले होते. त्यांचे तीन लढतीतून चार गुण आहेत.

सामन्याच्या पूर्वसंध्येला व्हारेला यांनी सांगितले, की "आम्ही प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच खेळतो आणि त्यात उद्या बदल नसेल. आघाडी वाढविण्याचे ध्येय आम्ही बाळगू आणि आशा करतो, की इतर निकालही आमच्या बाजूनेच लागतील. पंजाब एफसीविरुद्धच्या मागील लढतीत आम्ही खूप मोठा दृढनिश्चिय प्रदर्शित केला आणि त्यास आम्हाला चालना द्यायची आहे."

युवा खेळाडूंचा भरणा असलेला सुदेवा दिल्ली संघ तुल्यबळ असून आपल्या संघाला त्यांच्याकडून कडवी लढत अपेक्षित असल्याचे चर्चिल ब्रदर्सच्या स्पॅनिश प्रशिक्षकाने नमूद केले. आक्रमक खेळ करताना अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर भर कायम राखण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सचे 2 विजय व 1 बरोबरीसह 7 गुण

- सुदेवा दिल्लीचे प्रत्येकी 1 विजय, बरोबरी व पराभवासह 4 गुण

- चर्चिल ब्रदर्सचे 6, तर सुदेवा दिल्लीचे 4 गोल

- चर्चिल ब्रदर्सचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा याचे 4 गोल
 

संबंधित बातम्या