चर्चिल ब्रदर्सने आर्थिक भागीदार शोधावा : प्रफुल्ल  पटेल

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघाने भक्कम आर्थिक भागीदार मिळविल्यास त्यांना वलयांकित इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळणे शक्य होईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीच तसा सल्ला दिला आहे.

पणजी  : गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघाने भक्कम आर्थिक भागीदार मिळविल्यास त्यांना वलयांकित इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत खेळणे शक्य होईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीच तसा सल्ला दिला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी गोवा भेटीत चर्चिल ब्रदर्स भविष्यात आयएसएल स्पर्धेत खेळण्याबाबत शक्यता वर्तवली. चर्चिल ब्रदर्स हा अतिशय जुनाजाणता फुटबॉल क्लब आहे. मोहन बागान, ईस्ट बंगाल हे समुदायाचा मोठा पाठिंबा असलेले जुने क्लब आहेत, त्यांनाही आर्थिक भागीदार मिळवावा लागला. त्यामुळे आपण या चर्चिल ब्रदर्सचे प्रमुख चर्चिल आलेमाव यांना विनंती करतो, की त्यांनी आर्थिक भागीदार आणावा आणि आयएसएल स्पर्धेत प्रवेश करावा, असे पटेल  म्हणाले.

कोलकात्यातील मोहन बागानने एटीके संघाशी, तर ईस्ट बंगालने श्री सिमेंट लिमिटेडशी आर्थिक भागीदारी करून २०२०-२१ च्या आयएसएल स्पर्धेत प्रवेश केला आहे.  यंदापासून कोलकात्यातील दोन संघ आयएसएल स्पर्धेत खेळतील. चर्चिल ब्रदर्स सध्या आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी नेटाने तयारी करत आहे. आय-लीग स्पर्धेत खेळणारा चर्चिल ब्रदर्स हा सध्या गोव्यातील एकमेव संघ आहे. या स्पर्धेतील ते दोन वेळचे विजेते आहेत.  त्यांनी २००८-०९ व २०१२-१३ मोसमात आय-लीग विजेतेपद पटकाविले. दुसरीकडे, एफसी गोवा हा आयएसएल स्पर्धेतील २०१४ पासूनचा गोव्यातील एकमेव संघ आहे.

संबंधित बातम्या