I League : चर्चिल ब्रदर्सची सलग तीन सामने जिंकलेल्या गोकुळम केरळाविरुद्ध लढत

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील आघाडी भक्कम करण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना सोमवारी (ता. 1) सलग तीन सामने जिंकलेल्या गोकुळम केरळा संघास नमवावे लागेल.

पणजी : गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सला आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील आघाडी भक्कम करण्याची संधी आहे. त्यासाठी त्यांना सोमवारी (ता. 1) सलग तीन सामने जिंकलेल्या गोकुळम केरळा संघास नमवावे लागेल.

चर्चिल ब्रदर्स आणि गोकुळम केरळा यांच्यातील सामना कोलकाता येथे खेळला जाईल. चर्चिल ब्रदर्सचे सध्या 19 गुण आहेत. रविवारी महम्मेडन स्पोर्टिंगने रियल काश्मीरला 2-0 फरकाने हरविले. त्या निकालाचा फायदा चर्चिल ब्रदर्सला झाला आहे. रियल काश्मीरचे 17 गुण, तर महम्मेडन स्पोर्टिंगचे 16 गुण आहेत.

आशिया चषक रद्द झाल्यास त्याला भारत जबाबदार असेल; पाकचा आरोप

गोकुळम केरळा संघाने सलग तीन सामने जिंकताना अनुक्रमे ट्राऊ एफसी, इंडियन एरोज आणि सुदेवा दिल्ली संघास नमविले आहे. सोमवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास केरळच्या संघास 19 गुणांसह चर्चिल ब्रदर्सला गुणतक्त्यात गाठता येईल. माजी आय-लीग विजेत्या गोव्यातील संघाने अगोदरचे दोन्ही सामने जिंकले आहेत. स्पर्धेत अपराजित मालिका कायम राखण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

नेरोकाविरुद्ध जिंकलेल्या मागील लढतीत आपल्या संघाने छान खेळ केला. मोसमातील तो आमचा एक उत्कृष्ट सामना होता. आम्ही खूप संधी निर्माण केल्या, तसेच बचावही भक्कम राखला. आता आम्ही गोकुळम केरळाविरुद्धच्या लढतीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे, असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी सांगितले. गोकुळम केरळाविरुद्धचा सामना महत्त्वाचा असून प्रतिस्पर्धी आक्रमक फुटबॉल खेळत असल्याचेही व्हारेला यांनी नमूद केले.

 

दृष्टिक्षेपात...

- चर्चिल ब्रदर्सची कामगिरी : 9 सामने, 5 विजय, 4 बरोबरी, 19 गुण

- गोकुळम केरळाची कामगिरी : 9 सामने, 5 विजय, 1 बरोबरी, 3 पराभव, 16 गुण

- आय-लीगमध्ये एकमेकांविरुद्ध 5 लढतीत : गोकुळम केरळाचे 2, चर्चिल ब्रदर्सचा 1 विजय, 2 बरोबरी

- चर्चिल ब्रदर्सचा आघाडीपटू क्लेव्हिन झुनिगा याचे 6 गोल

संबंधित बातम्या