चर्चिल ब्रदर्स निसटत्या फरकाने विजयी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 13 मार्च 2021

चर्चिल ब्रदर्सने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत निसटत्या फरकाने विजय प्राप्त केला.

पणजी : गतवेळच्या संयुक्त विजेत्या चर्चिल ब्रदर्सने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत निसटत्या फरकाने विजय प्राप्त केला. त्यांनी झुंजार गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबवर 3-2 फरकाने मात केली.

सामना शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना क्लिंटन नियासो याने केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवता आले. त्यापूर्वी गिल्बर्ट ऑलिव्हेरा याने गार्डियन एंजलला आघाडी मिळवून दिली होती, नंतर 26व्या मिनिटास ट्रिजॉय डायसने चर्चिल ब्रदर्सला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात पाच मिनिटांत दोन गोल झाले. विल्यम नियासो याच्या स्वयंगोलमुळे चर्चिल ब्रदर्स आघाडीवर गेल्यानंतर बेनेस्टन बार्रेटोने गार्डियन एंजलसाठी बरोबरीचा गोल केला.  

ISL 2020-21: मुंबई सिटीस खुणावतोय करंडक; आयएसएल विजेतेपदासाठी एटीके मोहन...

सामन्याच्या सुरवातीस गार्डियन एंजलला पेनल्टी फटका मिळाला. चर्चिल ब्रदर्सच्या किड्रॉन फर्नांडिसने पेनल्टी क्षेत्रात चेंडू हाताळल्यानंतर मिळालेल्या स्पॉट किकवर गिल्बर्ट ऑलिव्हेरा याने अचूक फटका मारला. सामन्यातील अर्ध्या तासातील खेळापूर्वी चर्चिल ब्रदर्सने सेटपिसेस गोलवर पिछाडी भरून काढली. यग्य कपूर याच्या कॉर्नर किकवर ट्रिजॉयने चेंडूला अचूक दिशा दाखविली. पूर्वार्धात दोन्ही संघ गोलबरोबरीत होते.

सामन्याच्या 53व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला स्वयंगोलची बक्षिसी मिळाली. ट्रिजॉय डायसचा फटका गार्डियन एंजलच्या गोलरक्षकाने अडविला, पण चेंडू बचावपटू विल्यम नियासो याला आपटून नेटमध्ये गेला. त्यानंतर 58व्या मिनिटास गार्डियन एंजलने चर्चिल ब्रदर्सची आघाडी भेदली. बेनेस्टन बार्रेटोने चर्चिल ब्रदर्सच्या गोलरक्षकाला सणसणीत फटक्यावर चकविले. 83व्या मिनिटास ट्रिजॉयच्या असिस्टवर क्लिंटनने चर्चिल ब्रदर्सला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
 

संबंधित बातम्या