सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी क्लिफर्डना प्राधान्य?

सहाय्यक प्रशिक्षकपदासाठी क्लिफर्डना प्राधान्य?
Clifford Miranda

पणजी

एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक स्पॅनिश ज्युआन फरांडो यांचे सहाय्यक म्हणून क्लिफर्ड मिरांडा यांना प्राधान्य मिळण्याचे संकेत आहेत. गतमोसमात क्लिफर्ड यांनी संघाचे हंगामी प्रशिक्षक या नात्याने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जबाबदारी पेलली होती.

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक क्लिफर्ड यांनी गतमोसमात सर्जिओ लोबेरा यांना प्रशिक्षकपदावरून डच्चू दिल्यानंतर, पाच सामन्यांत हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. क्लिफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकून लीग विजेतेपदाचा मान मिळविला होता. उपांत्य फेरीत चेन्नईत ४-१ फरकाने हार पत्करल्यानंतर एफसी गोवाने परतीच्या लढतीत चेन्नईयीन एफसीला ४-२  हरविले होते, पण गोलसरासरीत चेन्नईच्या संघाने ६-५ फरकाने बाजी मारत आगेकूच राखली होती. लोबेरा यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये क्लिफर्ड यांचा समावेश होता.

धेंपो क्लबतर्फे पाच राष्ट्रीय विजेतेपदे मिळविलेले ३७ वर्षीय क्लिफर्ड २०१८ साली एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रुजू झाले. क्लब पातळीवर त्यांनी धेंपो स्पोर्टस क्लबचे तब्बल १५ वर्षे प्रतिनिधित्व केले. भारताकडून ते २००५-२०१४ या कालावधीत ४४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून सहा गोल केले आहेत. २०१७ साली ते व्यावसायिक फुटबॉल या नात्याने निवृत्त झाले.

क्लिफर्ड यांनी यावर्षी आशियाई फुटबॉल महासंघाचा प्रशिक्षणातील एएफसी प्रो-डिप्लोमा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. व्यावसायिक प्रशिक्षक या नात्याने आवश्यक पात्रता मिळविल्यामुळे आयएसएल स्पर्धेत एखाद्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी क्लिफर्ड पात्र आहेत, मात्र त्यांनी एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने कायम राहण्यास प्राधान्य दिल्याचे समजते. सध्याचा त्यांचा एफसी गोवाबरोबरचा करार जूनअखेरीस संपेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com