क्लिफर्ड यांचे फेरॅन्डोंना लाभणार साह्य

Kishor Petkar
शनिवार, 11 जुलै 2020

आगामी मोसमासाठी एफसी गोवाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी मुदतवाढ

पणजी

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक आणि प्रो-डिप्लोमाधारक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांना एफसी गोवा संघाने सहाय्यक प्रशिक्षकपदी मुदतवाढ दिली आहे. संघाचे स्पॅनिश प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांना क्लिफर्ड यांचे आगामी मोसमात साह्य लाभेल.

‘‘एफसी गोवासोबतची कारकीर्द पुढे नेताना मी आनंदित आहे आणि आगामी मोसमात संघाच्या यशात हातभार लावायचा आहे,’’ अशी प्रतिक्रिया ३७ वर्षीय क्लिफर्ड यांनी करारपत्रावर सही केल्यानंतर दिली. संघाचे नवे प्रशिक्षक फेरॅन्डो यांच्यासमवेत काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही क्लिफर्ड यांनी नमूद केले. आगामी मोसमात एफसी गोवा संघ एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणार आहे.

क्लिफर्ड गतमोसमातही (२०१९-२०) एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांना डच्चू दिल्यानंतर मोसमाच्या अखेरच्या टप्प्यात क्लिफर्ड यांनी पाच सामन्यांत हंगामी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली होती. क्लिफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकून लीग विजेतेपदाचा मान मिळविला होता. त्यामुळे एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेस पात्र ठरणारा पहिला भारतीय फुटबॉल संघ हा मान एफसी गोवास मिळाला होता.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी क्लिफर्ड यांच्या कामगिरीचा गौरव केला आहे. ‘‘क्लिफर्ड यांची प्रशिक्षक या नात्याने प्रगती स्तुत्य आहे. आमच्यासोबत रुजू झाल्यापासून त्यांनी शिकण्याची अविश्वसनीय भूक प्रदर्शित करताना स्वयंसुधारणेवर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखालील ज्युनियर आणि मुख्य संघातील खेळाडूंनीही प्रगती साधली आहे,’’ असे सांगत रवी यांनी क्लिफर्ड यांना शाबासकी दिली.

 क्लिफर्ड मिरांडा यांच्याविषयी...

- सहाय्यक प्रशिक्षक या नात्याने २०१९-२० मोसमात एफसी गोवा संघात रुजूत्यापूर्वी एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाचे प्रशिक्षक

- २०१९-२० मोसमाच्या अखेरीस हंगामी प्रशिक्षकत्यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचे ५ सामन्यात ४ विजय१ पराभव

- आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारताचे ४४ सामन्यांत प्रतिनिधित्व६ गोल नोंदविले

- आयएसएल स्पर्धेत खेळाडू या नात्याने एफसी गोवा आणि एटीके संघाचे १२ सामन्यांत प्रतिनिधित्व२ असिस्ट

- २०१९-२० मध्ये प्रशिक्षणातील एएफसी प्रो-डिप्लोमा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या