एफसी गोवाचा लढाऊ बाणा कौतुकास्पद

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

एका गोलच्या पिछाडीवरून विजय प्राप्त करणाऱ्या एफसी गोवा संघाच्या लढाऊ बाण्याचे प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी कौतुक केले आहे.

पणजी : एका गोलच्या पिछाडीवरून विजय प्राप्त करणाऱ्या एफसी गोवा संघाच्या लढाऊ बाण्याचे प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी कौतुक केले आहे. स्ट्रायकर इगोर आंगुलोच्या दोन गोलच्या बळावर त्यांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूर एफसीला 2-1 फरकाने हरविले.

वास्को येथील टिळक मैदानावर बुधवारी रात्री झालेल्या लढतीत आंगुलोने इंज्युरी टाईमच्या चौथ्या मिनिटास भेदक हेडिंग साधले. त्यामुळे दोन पराभवानंतर एफसी गोवास विजय मिळविता आला. ``खरं म्हणजे हा कठीण सामना होता. 10 दिवसांत आम्ही चौथा सामना खेळत होतो. संघाला तयार करणे खरोखरच अवघड ठरले, पण मी माझ्या संघाने प्रदर्शित केलेल्या दृष्टिकोनाबद्दल आनंदित आहे,`` असे फेरांडो सामन्यानंतर म्हणाले.

सामन्याची पूर्ण 90 मिनिटे आणि स्टॉपेज टाईममध्येही मेहनत घेणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे 39 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने नमूद केले. ``सामन्याच्या शेवटच्या सेकंदापर्यंत काम करणे ही आमची मानसिकता आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे आमचे खूपसे खेळाडू दमलेत, केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे, तरच मानसिकदृष्ट्याही. आता आम्हाला हैदराबाद एफसीविरुद्ध (30 डिसेंबर) तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत आहे,`` असे फेरांडो पुढील सामन्याविषयी म्हणाले.

 

एफसी गोवाची यंदाची कामगिरी

  • - 8 सामने, 3 विजय, 2 बरोबरी, 3 पराभव
  • - 11 गुण, 5वा क्रमांक
  • - 10 गोल नोंदविले, 9 गोल स्वीकारले
  • - इगोर आंगुलोचे एकूण 8 गोल, स्पर्धेत सर्वाधिक

संबंधित बातम्या