पणजी,
गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या वार्षिक आमसभेत रविवारी महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन २०२०-२४’ दस्तऐवज सादर करण्यात आला. त्यानुसार राज्यात व्यावसायिक बॅडमिंटन लीग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, तसेच अकादमी निर्मितीस प्राधान्यक्रम राहील.
खांडेपार येथे संघटनेची आमसभा झाली. त्यावेळी नरहर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पुढील चार वर्षांसाठी बिनविरोध ठरलेल्या व्यवस्थापकीय समितीच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष या नात्याने ठाकूर यांचा दुसरा कालावाधी आहे. यावेळी बोलताना ठाकूर यांनी सांगितले, की ‘‘भारतात आणि गोव्यातही बॅडमिंटन खेळाने विलक्षण वाढ साधली आहे. आमच्या काही खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर असामान्य कामगिरी प्रदर्शित केली आहे. गुणवत्ता शोधणे आणि पालनपोषण करणे या उद्देशाने पुढील काही वर्षे आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. देशातील प्रमुख राज्यांत स्थान मिळविण्याइतपत गोव्यापाशी क्षमता आहे. तनिशा क्रास्टो, अनुरा प्रभुदेसाई या मार्गदर्शक ठरल्या आहेत. व्हिजन दस्तऐवज आम्हाला उद्देशाची जाणीव करून देत आहे आणि दिशा दाखवत आहे. पुढील चार वर्षांत प्रशिक्षण आणि खेळाडूचा विकास यावर आमचा मुख्य भर असेल. याशिवाय आमची स्वतःची अकादमी सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होतील.’’
गोवा बॅडमिंटन संघटनेच्या चार वर्षांच्या कालावधीसाठी नरहर ठाकूर यांच्याव्यतिरिक्त व्यवस्थापकीय समितीत संदीप हेबळे (सचिव), सर्फराज शेख (खजिनदार), अनिल पैंगीणकर, गौरीश धोंड, पीटर तेलीस व संदीप खांडेपारकर (चौघेही उपाध्यक्ष), वामन फळारी (संयुक्त सचिव), लुसियान सुवारिस (संयुक्त खजिनदार), तसेच आग्नेल दा कुन्हा, डार्विन बार्रेटो, दीपक मयेकर, नीलेश नायक, पराग चौहान, संजय भोबे व वेन फर्नांडिस (सर्व सदस्य) यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेच्या व्हिजन २०२०-२४ कार्यवाहीसाठी आमसभेने आज अन्य सदस्यांची नियुक्ती केली. यामध्ये जुस्तो डिकॉस्ता, अनिकेत शेणई, दिलीप हळर्णकर, मयुरी आजगावकर व एडविन मिनेझिस यांचा समावेश आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत संघटनेचे मुख्य आश्रयदाते असतील, ते संघटनेचे माजी अध्यक्षही आहेत. रिचर्ड डिसोझा व अशोक मेनन यांची संघटनेचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. आमसभेस गोवा ऑलिंपिक असोसिएशनतर्फे जयेश नाईक व गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे महेश रिवणकर यांची निरीक्षक या नात्याने उपस्थिती होती.
गोव्यातील बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी...
- संघटनेची बहुउद्देशीय बॅडमिंटन अकादमी
- व्यावसायिक बॅडमिंटन लीग
- आंतरशहर मिनी बॅडमिंटन लीग
- खुल्या मैदानावरील एअर बॅडमिंटनचा प्रसार
- पॅरा बॅडमिंटनपटूंस प्रोत्साहन
- खासगी आणि कॉर्पोरेट भागीदारी
- क्लब विकास, आर्थिक निधीत वाढ
- तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
- स्थानिक बॅडमिंटन स्तरावर सुधारणा
- राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर स्पर्धा
‘‘आमच्या लक्ष्यप्राप्तीसाठी आम्ही गोवा क्रीडा प्राधिकरणासमवेत हातात हात घालून कार्यरत राहू. गोव्यातील बॅडमिंटनच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी सर्व संबंधित भागधारकांना निमंत्रित केले जाईल.’’
- संदीप हेबळे, सचिव गोवा बॅडमिंटन असोसिएशन.
संपादन - तेजश्री कुंभार