गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात सलामीवीरासाठी चुरस

गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात सलामीवीरासाठी चुरस
Competition for opening player amongst Goa Ranji team

पणजी : रणजी करंडक क्रिकेट मोसम जानेवारीत सुरू होण्याची शक्यता गृहित धरून गोवा क्रिकेट संघटनेने संभाव्य संघाची निवड जाहीर केली आहे. त्यात सलामीला खेळू शकणारे पाच फलंदाज आहेत, साहजिकच अंतिम अकरा सदस्यीय संघातील जागेसाठी जोरदार चुरस राहील, त्यात फलंदाजाचा अनुभव निर्णायक ठरू शकतो.

गोव्याचा अनुभवी फलंदाज अमोघ देसाई दुखापत आणि नंतरची शस्त्रक्रिया यातून सावरला असून त्याला संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे. उपयुक्त गोलंदाज असलेला अमोघ संघासाठी समतोल साधणारा ठरतो. दुखापतीमुळे तो रणजी स्पर्धेचा गतमोसम खेळू शकला नाही. २०१२-१३ पासूनच्या रणजी कारकिर्दीत तो बहुतांश सलामीला खेळलेला आहे. ४५ रणजी सामन्यात अमोघने ३५.१८च्या सरासरीने २४९८ धावा केल्या असून त्यात सहा शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. अनुभवाचा विचार करता, अमोघला सलामीवीरासाठी अधिक पसंती असेल.

सुमीरन आमोणकर मागील चार मोसम गोव्याचा रणजी स्पर्धेतील नियमित सलामीवीर आहे. गतमोसमातील प्लेट गटात त्याने जोमदार फलंदाजी करताना १० सामन्यांत ४६.१४च्या सरासरीने ३ शतके व एका अर्धशतकाच्या मदतीने ६४६ धावा केल्या होत्या. पदार्पणापासूनच्या चार रणजी मोसमात सुमीरनने ३२ सामन्यांत ३३.१३च्या सरासरीने १७५६ धावा करताना पाच शतके व सात अर्धशतकांची नोंद केली आहे. खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करणाऱ्या सुमीरनने सलामीवीर या नात्याने यापूर्वीच ठसा उमटविला आहे.

गतमोसमातील रणजी प्लेट स्पर्धेत वैभव गोवेकर या नवोदिताचे पदार्पण लक्षणीय ठरले. तो पाच सामने खेळला, त्यात त्याने ५०.८५च्या सरासरीने ३५६ धावा केल्या. वैभवने एक शतक व दोन अर्धशतके नोंदविली. वैभवमुळे गोव्यापाशी सलामीच्या जागेसाठी चांगला पर्याय आहे. गतमोसमात पाहुण क्रिकेटपटू असलेला आदित्य कौशिक रणजी स्पर्धेत अपयशी ठरला. दिल्लीचा हा सलामीचा फलंदाज यंदा गोव्यासाठी स्थानिक खेळाडू आहे. त्यामुळे निवडीसाठी तोही उपलब्ध असेल. आदित्यने २०१९-२० मोसमातील सहा रणजी सामन्यात १५.३३ या निराशाजनक सरासरीने एका अर्धशतकासह १३८ धावा केल्या.

संभाव्य संघात स्थान मिळालेला ईशान गडेकर या उदयोन्मुख फलंदाज आहे. गतमोसमातील २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात या गुणवान फलंदाजाने सलामीस खेळताना धावांचा रतीब टाकला. त्याने आठ सामन्यांत ६८.४१च्या सरासरीने ८२१ धावा केल्या. त्याने दोन शतके व चार अर्धशतकांची नोंद केली. स्पर्धेच्या अखिल भारतीय क्रमवारीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत त्याला नववा क्रमांक मिळाला. गोवा रणजी संघ निवड समितीचे ईशानच्या गतमोसमातील कामगिरीकडे निश्चितच लक्ष असेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com