कोरोना महामारीमुळे चॅम्पियन्स लीग शहरात फुटबॉलचा उत्साह सुनासुना

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

ना फॅन झोन्स आहेत ना खेळाडूंची ॲक्‍शन दाखवणाऱ्या जाहिराती. तिकिटांसाठी चाहत्यांची झुंबड नाही किंवा हॉटेल रूम मिळवण्यासाठी होत असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचा मागमूसही दिसत नाही.

लिस्बन: कोरोना महामारीमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीपासून सर्व लढती पोर्तुगालच्या राजधानीत होत आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या कालावधीतील ही सर्वांत महत्त्वाची स्पर्धा मानली जात आहे, पण लिस्बनमध्ये फेरफटका मारला तर याची जाणीवही होत नाही.

 

जगातील फुटबॉलच नव्हे, तर अब्जावधी क्रीडा रसिकांचे लक्ष उद्यापासून सुरू होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतींकडे लागले आहे. चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्यामुळे तिकीट विक्रीसाठी गर्दी किंवा स्पर्धेचे प्रमोशनल कार्यक्रम होणार नाहीत हे समजण्यासारखे आहे; मात्र विमानतळावरही संघांच्या स्वागताचे फलक नाहीत. शहरात कुठेही ते दिसत नाहीत. ना फॅन झोन्स आहेत ना खेळाडूंची ॲक्‍शन दाखवणाऱ्या जाहिराती. तिकिटांसाठी चाहत्यांची झुंबड नाही किंवा हॉटेल रूम मिळवण्यासाठी होत असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांचा मागमूसही दिसत नाही.

 

चाहत्यांच्या हालचालीवर मर्यादा असल्यामुळे स्थानिक बार अथवा रेस्टॉरंटचा बिझनेसही वाढलेला नाही. लिस्बनमधील व्यवहार सुरू असले, तरी बार रात्री ८ पर्यंतच सुरू आहेत; तर रेस्टॉरंट रात्री ११ वाजता बंद केले जात आहेत. मास्कची सक्ती कसोशीने पाळली जात आहे. कुठेही गर्दी करण्यास प्रतिबंध आहे.

 

आपल्या आवडत्या खेळाडूची किमान झलक दिसेल ही आशाही कोणालाही नाही. संघाचा मुक्काम तसेच सराव जैवसुरक्षित वातावरणात होत आहे. संघ तसेच खेळाडूंवर निर्बंध आहेत. मुक्कामाच्या हॉटेलमध्ये संघासाठी खास डायनिंग हॉल आहे, तसेच त्यांचा प्रवेशही स्वतंत्र आहे. एकंदरीत हुल्लडबाजीची शक्‍यता धूसर असल्याने सुरक्षा यंत्रणेने जैवसुरक्षित वातावरण कायम राहील याकडेच लक्ष दिले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या