फ्रेंच टेनिस कोर्टबाहेरच गाजणार

वृत्तसंस्था
रविवार, 27 सप्टेंबर 2020

प्रेक्षकांवरील मर्यादेमुळे संयोजक त्रस्त; त्यातच पावसाच्या सर्व्हिसचा धोका

पॅरिस:  चार महिने लांबणीवर टाकण्यात आलेली फ्रेंच टेनिस स्पर्धा काही तासांवर आली आहे, पण सयोजकांची डोकेदुखी प्रत्येक दिवसागणिक वाढत आहे. चाहत्यांची संख्या मर्यादित केल्यामुळे लाखो युरोवर पाणी सोडावे लागणार आहे, त्यातच पावसाची घोंघावत असलेली सर्व्हिस आणि टीका होत असलेले टेनिस बॉल स्पर्धा मैदानाबाहेर गाजवण्याची जास्त चिन्हे आहेत.

मे-जूनमध्ये होणारी फ्रेंच ओपन कोरोनामुळे चार महिने लांबणीवर टाकण्यात आली, पण नव्याने स्पर्धा होत असताना कोरोना कमी झालेला नाही. परिणामी फ्रान्स सरकारने रोज एक हजार चाहतेच असतील असे स्पष्ट केले. संयोजक रोज पाच हजार चाहत्यांना प्रवेश असेल असे निश्‍चित समजून आपले आर्थिक गणितबसवत होते. मात्र आता चाहते कमी झाल्यामुळे लाखो युरो हवेत गेले आहेत, अशी कबुली संयोजकांनी दिली.

एक हजार चाहत्यांना प्रवेश असला तरी त्यातील अडीचशे पाहुणे असतील. त्यात पुरस्कर्ते, फ्रेंच टेनिस संघटनेचे पदाधिकारी असतील. रोजची केवळ साडेसातशेच तिकिटे विक्रीस असतील. 

पावसाचे सावट
स्पर्धेपूर्वीच्या पत्रकार परिषदेस माजी विजेती गॅबिएन मुगुरुझा रेनकोट परिधान करून आली. त्यामुळे संयोजकांसमोर कोरोनाचेच नव्हे तर पावसाचे आव्हान असेल हे स्पष्ट झाले. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

चेंडू जड , कमी वेगवानही
रॅफेल नदालला हवामानापेक्षा चेंडूंचा प्रश्‍न भेडसावत आहे. या स्पर्धेत वापरण्यात येणारे चेंडू खूपच वेगळे आहेत. ते खूपच कमी वेगाने येतात, तसेच ते जडही आहेत. कोर्टही स्लो आहे. अशी टीका नदालने केली.

संबंधित बातम्या