ठरलं...! पहिल्या कसोटी सामन्यात विराटला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 'प्लॅन' तयार

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 डिसेंबर 2020

भारताविरुद्धच्या बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास येत्या गुरुवपासून सुरुवात होत आहे.

ॲडलेड- क्रिकेटविश्‍वातील सध्याच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जात असलेल्या विराट कोहलीबाबत आम्हाला आदर आहेच; परंतु पहिल्या कसोटीसाठी आम्ही त्याच्यासाठी रणनीती तयार केली आहे, असे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी सांगितले.

भारताविरुद्धच्या बहुचर्चित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास येत्या गुरुवपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली हा सामना खेळल्यानंतर पितृत्वाच्या सुट्टीसाठी मायदेशी परतणार आहे. तो केवळ या पहिल्या सामन्यात खेळणार असला, तरी ऑस्ट्रेलियाने कोहलीला बाद करण्यासाठी तयारीत कोणतीही कसर ठेवलेली नाही.

कोहलीवर वर्चस्व मिळवून आम्हाला कसोटी मालिकेची दिशा निश्‍चित करता येईल, असे लॅंगर यांचे म्हणणे आहे. ते पुढे म्हणतात, तो सर्वोत्तम खेळाडू आणि तेवढाच ग्रेट कर्णधारही आहे. त्याच्याविषयी माझ्या मनात मोठा आदर आहे. त्याची विकेट आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे आम्ही कडेकोट रणनीती तयार केली आहे. तयार केलेल्या रणनीतीची योग्य अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे आहे. विराटला धावा करू न देणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. विराटचा खेळ आम्ही बारकाईने पाहिलेला आहे, तसाच त्यानेही आमचा चांगला अभ्यास केलेला असेल, असे लॅंगर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

‘बदला’ हा शब्द योग्य नाही

गेल्या दौऱ्यात भारताने मालिका जिंकली होती. त्यामुळे या वेळी तुम्ही बदला घेणार का, याबाबत बोलताना लॅंगर यांनी, मुळात ‘बदला’ शब्द आपल्याला आवडत नाही. क्रिकेटमधील एक चांगले द्वंद असे तुम्ही म्हणू शकता. आयपीएलमध्ये एकत्रितपणे खेळत असल्यामुळे खेळाडूंमध्ये मित्रत्वाची भावना तयार झाली आहे, असे सांगितले.

संबंधित बातम्या