बुमराह आणि शमीचा मारा भेदण्यासाठी ऑस्ट्रेलियाने कोणाला समोर आणलंय? वाचा...

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

बॉर्डर-गावस्कर सीरिजच्या निमित्तानेच दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत. आयपीएलच्या मोठ्या हंगामानंतर आता सर्व भारतीय खेळाडू एकत्र क्रिकेट खेळणार आहेत.   

बॉर्डर- गावस्कर सीरिज दोन दशकांहून अधिक काळापासून घेतली जाते. कोरोनाकाळात झालेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा क्रिकेट सुरू झाल्यावर भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. विशेष म्हणजे बॉर्डर-गावस्कर सीरिजच्या निमित्तानेच दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत. आयपीएलच्या मोठ्या हंगामानंतर आता सर्व भारतीय खेळाडू एकत्र क्रिकेट खेळणार आहेत.   

भारतीय संघ आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनीत दाखल झाला आहे. त्याच क्षणी ऑस्ट्रेलियाने आपला संघही जाहीर केला आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ज्यात ५ पूर्णत: नवोदित खेळाडू आहेत.  

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाच्या कर्णधारपदाची धुरा टीम पेनकडे देण्यात आली आहे. या संघात नवोदित खेळाडूंना यावेळी जास्त संधी देण्यात आली आहे. ऑस्टेलियातील डोमेस्टीक सीझनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडू कॅमेरून ग्रीन आणि विल पुकोवस्की यांच्यासह पाच नवीन चेहरे संघाचा भाग असतील. यांच्याशिवाय सीन अॅबॉट, मिशेल स्वेप्सन, माइकल नेसेर यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.      

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकूण सामने-  

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये आधी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या २७ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होणार असून २ डिसेंबरपर्यंत ही मालिका चालणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेनंतर भारतीय संघ तीन टी२० सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. ४ डिसेंबरला सुरू होणारी ही मालिका ८ डिसेंबरपर्यंत चालेल. यानंतर १७ डिसेंबरपासून खऱ्या हंगामाला सुरूवात होणार असून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी ही कसोटी मालिका खेळणार आहे. 

भारतीय संघाला टक्कर देण्यासाठी जाहीर करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ-

 टीम पेन (कर्णधार) जो बर्न्स, सीन अॅबॉट पॅट कमिंसन, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मॅथ्थू वेड, मायकल नेसेर, विल पुकोवस्की, जेम्स पॅटिंन्सन, मिशेल स्वेप्सन, मार्नस लबुशेन, नॅथन लायन, कॅमेरून ग्रीन,  

संबंधित बातम्या