गोव्‍यात क्रिकेट स्‍पर्धा शक्‍य की अशक्‍य?

dainik gomantak
मंगळवार, 5 मे 2020

विपुल यांनी सांगितले, की ``लॉकडाऊनच्या कालावधीत पर्वरी येथील जीसीएचे मुख्य कार्यालय बंद असताना कार्यालयीन कर्मचारी अत्यावश्यक बाबींकरता घरून कार्यरत होते.

पणजी,

 कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले गोवा क्रिकेट संघटनेचे (जीसीए) प्रशासन पूर्ववत सुरू झाले आहे. गोवा ग्रीन झोनमध्ये आल्यानंतर सरकारचे घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करत जीसीएने कार्यालयीन कामास प्रारंभ केला आहे, असे संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी सांगितले. मात्र स्पर्धा सुरू होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

जीसीए पर्वरी येथील मैदानाच्या मोसमपूर्व कामास प्राधान्य देणार आहे, मात्र जोपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) संमती मिळत नाही, तोपर्यंत स्पर्धा होणार नाहीत, असे विपुल यांनी स्पष्ट केले. ``१७ मे रोजी लॉकडाऊन ३.० संपल्यानंतर जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक बोलावली जाईल. त्यावेळी विविध बाबींवर सविस्तर चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल. सध्यातरी अर्धवट राहिलेला मोसम सुरू करण्याची शक्यता कमी आहे. २०२०-२१ मोसमाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जातील,`` असे विपुल म्हणाले. जीसीएच्या आर्थिक विषयक कामासही आता वेग मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

विपुल यांनी सांगितले, की ``लॉकडाऊनच्या कालावधीत पर्वरी येथील जीसीएचे मुख्य कार्यालय बंद असताना कार्यालयीन कर्मचारी अत्यावश्यक बाबींकरता घरून कार्यरत होते. मैदानावर दरदिवशी दोन तास दोन कामगार सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करत होते. आता लॉकडाऊन ३.०मध्ये निर्बंधांत शिथिलता आल्यामुळे आवश्यक खबरादारी घेत मैदानाचे मोसमपूर्व काम पूर्ण करण्यावर भर राहील.``

कोविड-१९ मुळे जीसीएने १६ मार्चपासून आपल्या सर्व स्पर्धा स्थगित केल्या होत्या, नंतर पर्वरी येथील मुख्य कार्यालयही बंद केले होते. पावसाळा जवळ येत आहे, तसेच सध्या उष्णताही वाढली आहे. त्यामुळे जीसीए राज्यांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याची अजिबात शक्यता नाही. थेट २०२०-२१ मधील मोसम आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांसाठी संघ बांधणी यावर भर देण्याचे विपुल यांनी सुचित केले आहे.

संबंधित बातम्या