काणकोणमधील शाळांसाठी क्रिकेट खेळपट्टी

Dainik Gomantak
शनिवार, 6 जून 2020

जीसीएचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांचे आश्वासन, १७ शालेय संघाना क्रिकेट साहित्य

काणकोण

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) काणकोण तालुक्यातील शालेय क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्या दृष्टीने खेळपट्टी आणि नेटची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन संघटनेचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांनी शुक्रवारी दिले.
जीसीएतर्फे काणकोण तालुक्यातील १७ माध्यमिक शाळांना एकूण ७० हजार रुपयांचे क्रिकेट साहित्य प्रदान करण्यात आले. त्यावेळी चेतन देसाई बोलत होते. चार रस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सभागृहात कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर नियमाचे भार राखून हा कार्यक्रम झाला.
तालुक्यातील ज्या शाळा खेळपट्टी आणि नेट व्यवस्थेसाठी इच्छुक आहेत, त्यांनी तसा प्रस्ताव जीसीएकडे पाठवावा, असे आवाहन चेतन यांनी यावेळी केले. जीसीएने २०१९-२० मोसमात घेतलेल्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत भाग घेतलेल्या १७ शाळांना क्रिकेट साहित्य देण्यात आले. संबंधित शाळांच्या शारीरिक शिक्षण शिक्षकांनी खेळाडूंच्या वतीने साहित्य स्वीकारले.
यावेळी जीसीएचे उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई, संयुक्त सचिव अब्दुल माजिद, श्री मल्लिकार्जुन विद्यालय समितीचे अध्यक्ष महेंद्र देसाई, मल्लिकार्जुन देवालय समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे सचिव के. बी. गावकर उपस्थित होते. शुभम गावस व त्रिशूल फळदेसाई यानी पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज नाईक गावकर यांनी केले. अचिकेत देसाई यांनी आभार मानले.

मल्लिकार्जुन विद्यालय मैदानाचा विकास
शिक्षणाबरोबरच खेळही महत्वाचे आहेत, त्यासाठी चांगल्या क्रीडा मैदानाची गरज आहे. कोमुनिदाद संस्थेने श्री मल्लिकार्जुन विद्यालयाला मैदानासाठी जमीन दिली आहे. त्याठिकाणी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने विकास करण्याचे जीसीएचे उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई यांनी सूचित केले. जीसीएच्या शालेय क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यातील सर्व तालुक्यातील शालेय क्रिकेट संघांना क्रिकेट साहित्य दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

संबंधित बातम्या