देशांतर्गत क्रिकेटला अद्याप मिळेना मुहूर्त; कोरोनाची परिस्तिथी सुधारल्यावरच क्रिकेट शक्य: सौरव गांगुली

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटचा प्राथमिक विचार केलेला आहे. त्यात यंदा केवळ तीनच स्पर्धा घेण्याचा विचार मांडण्यात आलेला आहे आणि मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-२० स्पर्धेद्वारे नोव्हेंबरमध्ये मोसम सुरू होणे अपेक्षित आहे, परंतु कोरोनाचा देशभर असलेला विळखा अजूनही सुटलेला नाही.

नवी दिल्ली: बहुचर्चित आयपीएल पुढील महिन्यात सुरू होत आहे, मात्र देशांतर्गत क्रिकेटला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली स्वतः अनभिज्ञ आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट सुरू होईल, असे त्यांनी सांगितले, परंतु तारखेचा उल्लेख करण्यात असमर्थ ठरले. 

सर्वसाधारपणे देशांतर्गत क्रिकेटचा मोसम ऑगस्टमध्ये सुरू होतो, परंतु कोरोनामुळे यंदाचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडले आहे. यंदाच्या मोसमाचा कार्यक्रम अजूनही तयार करण्यात आलेला नाही, असे गांगुली यांनी सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटचा प्राथमिक विचार केलेला आहे. त्यात यंदा केवळ तीनच स्पर्धा घेण्याचा विचार मांडण्यात आलेला आहे आणि मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-२० स्पर्धेद्वारे नोव्हेंबरमध्ये मोसम सुरू होणे अपेक्षित आहे, परंतु कोरोनाचा देशभर असलेला विळखा अजूनही सुटलेला नाही.

जेव्हा कधी परिस्थिती सुधारेल तेव्हापासून देशातील क्रिकेट सुरू करण्यास आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, खेळाडू आणि खेळाशी संबंधीत सर्वांचे आरोग्य ही प्राथमिकता आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असे गांगुली यांनी पत्रात म्हटले आहे. सर्व संघटनांना वेळोवेळी नव्या घडामोडींची कल्पना देण्यात येईल आणि तुमच्या सुचनांनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असाही उल्लेख त्यांनी केला आहे.

पुढील आयपीएल एप्रिलमध्ये
आयसीसीने तयार केलेल्या कार्यक्रमानुसार या वर्षाअखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे त्यानंतर वर्षाच्या सुरूवातीस भारतात इंग्लंडविरुद्धची मालिका खेळवणार आहोत. त्यानंतर एप्रिमध्ये आयपीएल होईल. त्याचबरोबर २०२१ मध्ये भारतात टी-२० विश्‍वकरंडकही होणार आहे, अशी माहिती गांगुली यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या