भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

चौहन सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांना कोरोना झाल्याचे १२ जुलैस जाहीर झाले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालावली.

नवी दिल्ली: भारताचे माजी कसोटी सलामीवीर चेतन चौहान (वय ७३) यांचे कोरोनामुळे आज निधन झाले. त्यांना जुलैत कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.

चाळीस कसोटींत डावाची सुरूवात केलेल्या चौहान यांची तंत्रशुद्ध फलंदाजात गणना होत असे. त्यांचा बचाव भक्कम होता; तसेच ते कमालीचे जिगरबाज होते. त्यांच्याकडे फारसे स्ट्रोक नव्हते; पण कसोटीत हवा असलेला संयम त्यांच्याकडे होता. एक बाजू भक्कम लावून धरत. सुनील गावसकर यांचे ते सलामीतील सहकाही होते. 

चौहन सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांना कोरोना झाल्याचे १२ जुलैस जाहीर झाले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालावली.

त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते व्हेंटिलेटरवरच होते. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष असलेले चौहान यांनी संघटनेत विविध पदांवर काम केले. ते दोनदा खासदारही होते.

चौहान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला; पण त्यांनी पुण्यात शिक्षण घेतले. त्यामुळे त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास १९६७-६८ मध्ये सुरुवात महाराष्ट्राकडूनच केली. त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीकडून भरपूर धावा केल्या. 

चौहान यांची कारकीर्द

  •  ४० कसोटीत ६९ डावांत ३१.५७ च्या सरासरीने २ हजार ८४ धावा. त्यात १६ अर्धशतके. सर्वोत्तम ९७.
  •  ७ एकदिवसीय सामन्यात ७ डावात २१.८५ च्या सरासरीने १५३ धावा. सर्वोत्तम ४६

महत्त्वाचे

  • १७९ प्रथम श्रेणी सामन्यात ४०.२२ च्या सरासरीने ११ हजार १४३ धावा.  
  • प्रथम श्रेणी कारकिर्दीत ५९ अर्धशतके आणि २१ शतके.
  • कसोटीत १६ अर्धशतके; पण एकही शतक नाही
  • कसोटीत शतक नसलेल्या फलंदाजातील सर्वाधिक धावा काही वर्षांपर्यंत चौहान यांच्या होत्या; त्यांना वॉर्नने मागे टाकले

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या