रोनाल्डोने गोलची सेंचुरी करत रचला इतिहास

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

नेशन्स लीग स्पर्धेत स्वीडनविरुद्धच्या सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली. सामना सुरू होताच मिळालेल्या फ्रिकीवर रोनाल्डोने २५ मीटर अंतरावरून अप्रतिम गोल केला. या सामन्यात पोर्तुगालने २-० असा विजय मिळवला.

स्टॉकहोल्म: पोर्तुगालचा सुपरस्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने १०० वा आंतरराष्ट्रीय गोल करून शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला, अशी कामगिरी करणारा तो फुटबॉल विश्‍वातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

नेशन्स लीग स्पर्धेत स्वीडनविरुद्धच्या सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली. सामना सुरू होताच मिळालेल्या फ्रिकीवर रोनाल्डोने २५ मीटर अंतरावरून अप्रतिम गोल केला. या सामन्यात पोर्तुगालने २-० असा विजय मिळवला.

इराणचा अली दायेई १०० आंतरराष्ट्रीय गोल करणारा पहिला खेळाडू आहे. रोनाल्डोने ‘क्‍लब १००’ मध्ये आपली जागा निर्माण करताच त्याने केलेला जल्लोष रिकाम्या स्टेडियममध्येही उठून दिसणारा होता. समोर प्रेक्षक असो वा नसोत, त्याने आपल्या खास शैलीत या गोलाचा आनंद साजरा केला.

पोर्तुगालकडून रोनाल्डोने १६५ सामने खेळला आहे. १०० वा आंतरराष्ट्रीय गोल केल्यानंतर त्याने आणखी एका गोलाची मेजवानी सादर केली. आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी रोनाल्डोला आणखी नऊ गोलांची गरज आहे. इराणच्या अली दायेईने १९९३ ते २००६ या कालावधीत खेळताना १०९ आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.

सर्वोत्तम फुटबॉलपटूचे अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या रोनाल्डोने चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक १३१ गोल करण्याचा विक्रम केलेला आहे. लिओनेल मेस्सीपेक्षा १६ गोलांनी मेस्सी पुढे आहे. 

या नेशन्स लीगमध्ये पोर्तुगालचा हा सलग दुसरा विजय आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात त्यांनी क्रोएशियावर ४-१ अशी मात केली होती. त्या सामन्यात रोनाल्डो पावलाला दुखापत झाल्यामुळे खेळू शकला नव्हता. बेल्जियम आणि विश्‍वविजेते फ्रान्स यांच्या नावावर सर्वाधिक गुण आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बेल्जियमने आईसलॅंडवर ५-१ तर फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ मात केली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या