लंडनमधील अपघातामुळे 'फॉर्म्युला वन' चा धोका पुन्हा अधोरेखित

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

 फॉर्म्युला वन कारचे दोन तुकडे होऊन ती जळाल्यानंतरही केवळ हाताला जखमा होऊन रोमेन ग्रॉसजेन बचावला. मात्र फॉर्म्युला वनचा थरार किती धोकादायक होऊ शकतो याची जाणीव या अपघातामुळे पुन्हा करून दिली. 

लंडन :  फॉर्म्युला वन कारचे दोन तुकडे होऊन ती जळाल्यानंतरही केवळ हाताला जखमा होऊन रोमेन ग्रॉसजेन बचावला. मात्र फॉर्म्युला वनचा थरार किती धोकादायक होऊ शकतो याची जाणीव या अपघातामुळे पुन्हा करून दिली. 

या अपघाताची आधुनिक शर्यतीत कोणीही कल्पनाही केली नसेल. शर्यतीच्या मार्गाशेजारील कुंपणावर ग्रॉसजेनची कार ताशी २५० किमी वेगाने आदळली. त्याचे दोन तुकडे झाले. गाडीने पेट घेतला. त्या गाडीने कुंपण तोडले होते. ग्रॉसजेन या अपघातग्रस्त पेटलेल्या गाडीत अर्धा मिनीट होता. त्याने सीटबेल्टमधून स्वतःची सुटका करून घेतली आणि प्रसंगावधान राखत स्वतःला बाहेर काढले होते. कार विझवण्यास सुरुवात होत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रॉसजेनला मदत केली होती. 

गेल्या काही वर्षांत फॉर्म्युला वनने सुरक्षेस महत्त्व दिल्यामुळेच ग्रॉसजेन बचावला असेच मानले जात आहे. हॅलो हेड यंत्रणेमुळेच तो वाचू शकला. चालकाच्या डोक्‍याभोवती असलेल्या या यंत्रणेमुळे कार आपटल्यावरही ग्रॉसजेन वाचू शकला. १९९४ मध्ये आर्यटन सेनाचे निधन झाल्यानंतर कार जास्त सुरक्षित झाली. २०१४ मध्ये ज्यूल्स बिआंची याला अपघात झाला, त्यावेळी डोक्‍याला दुखापत होऊ नये याची यंत्रणा विकसित करणे सुरू होते. 

धोकादायक फॉर्म्युला वन

  •  १९९१ च्या मोनॅको शर्यतीच्यावेळी यापूर्वी कार तुटली होती.
  •  १९८९ च्या इमोला शर्यतीच्यावेळी कारला आग लागली होती.
  •  १९७३ मध्ये कार अडथळ्यावर वेगाने आपटून झालेला अपघातात फ्रॅंकॉईस केव्हेर्ट यांचे निधन.
  •  १९७४ मध्ये झालेल्या अपघातात हेम्लत कॉईनिग यांचे निधन.

"अपघात पाहून धास्ती वाटली. अपघातानंतरची कार, कॉकपीट पाहून तो कसा बाहेर पडला हेच कळत नाही."
- लुईस हॅमिल्टन, फॉर्म्युला वन शर्यतीचा विजेता.
 

"हॅलो हेड यंत्रणेस मी विरोध केला होता. मात्र फॉर्म्युला वन शर्यतीतील ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याची खात्री आता मला झाली आहे."
 - ग्रॉसजेन, अपघातग्रस्त स्पर्धक.

 

अधिक वाचा :

आज आयएसएलमध्ये मुंबई सिटीसमोर नवोदित ईस्ट बंगालचे आव्हान

गौतम गंभारकडून विराटच्या कॅप्टसीवर पुन्हा टिका

 

संबंधित बातम्या