गोव्याच्या दनुष्का दा गामा राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशासनात; संयुक्त सचिवपदी निवड

गोव्याच्या दनुष्का दा गामा राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशासनात; संयुक्त सचिवपदी निवड
Danushka Da Gama from Goa becomes the first lady to get elected in the National Boxing Administration

पणजी : भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या कार्यकारी समितीवर संयुक्त सचिवपदी (पश्चिम विभाग) निवडून आलेल्या गोव्याच्या दनुष्का दा गामा या एकमेव महिला पदाधिकारी आहेत. या पदाच्या निवडणुकीत त्यांनी दादरा आणि नगर हवेलीच्या राजेश देसाई यांच्यावर 33-31 अशी दोन मतांनी मात केली. दनुष्का या गोवा बॉक्सिंग संघटनेच्या सचिव आहेत. त्यांचे वडील लेनी दा गामा हे भारतीय बॉक्सिंगमधील परिचित नाव आहे. गोवा आणि भारतीय बॉक्सिंग प्रशासनात काम केलेल्या लेनी यांनी भारतीय बॉक्सिंग संघाचे व्यवस्थापकपदीही भूषविले आहे. ते आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रेफरीही आहेत. वडिलांच्या पाऊलखुणांवरून आता दनुष्का यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशासनात प्रवेश केला आहे.

‘‘भारतीय बॉक्सिंग महासंघातील इतर अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत मी कितीतरी तरूण आहे, तरीही सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील. भारतीय बॉक्सिंग महासंघ देशातील एक प्रमुख क्रीडा महासंघ आहे. आमच्यासाठी हे महत्त्वाचे वर्ष आहे. ऑलिंपिकसाठी आतापर्यंत नऊ बॉक्सर पात्र ठरले असून आणखी बॉक्सरना संधी आहे,’’ असे दनुष्का यांनी सांगितले. महासंघात पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करताना गोव्यासह गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, महाराष्ट्रातील बॉक्सिंगच्या विकासाठी कटीबद्ध राहण्याची ग्वाही दनुष्का यांनी दिली.

बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीत अजय सिंग सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी आशिष शेलार यांचा 37-27 मतफरकाने पराभवकेला. आसामचे हेमंत कलिता सचिवपदी, तर मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग खजिनदारपदी निवडून आले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com