INDvsENG : पहिलीच कसोटी जी दुसऱ्याच दिवशी संपली; वाचा नेमका कोणता विक्रम झाला ते   

INDvsENG : पहिलीच कसोटी जी दुसऱ्याच दिवशी संपली; वाचा नेमका कोणता विक्रम झाला ते   
INDvsENG Day Night

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळलेला कसोटी सामना हा दुसऱ्याच दिवशी संपलेला आहे. शिवाय चार सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा कसोटी सामना डे नाईट होता. आणि त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी तो संपल्याने याची इतिहासात वेगळीच नोंद झालेली आहे. अवघ्या दोनच दिवसांत टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला धूळ चारत विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर पाच दिवसांचा कसोटी सामना हा दुसऱ्याच दिवशी संपला असे क्वचितच पाहायला मिळते. यापूर्वी 2018 मध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानच्या संघावर सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी विजय मिळवला होता. 

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी धमाकेदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि यावेळी रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल या जोड गोळीने दमदार कामगिरी केल्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर आटोपला होता. पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने सहा आणि अक्षर पटेलने तीन विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात अक्षर पटेलने पाच आणि अश्विनने चार बळी टिपले. त्यामुळे इंग्लंडचा संघ पुन्हा 81 धावांवर सर्वबाद झाला. आणि इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांचे लक्ष दिले होते. जे भारतीय संघाने एकही विकेट न गमावता गाठले. व सामना दुसऱ्याच दिवशी आपल्या खिशात घातला. 

यासह अहमदाबाद मधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना हा कसोटी मधील दुसऱ्याच दिवशी संपणारा 22 वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना ठरला आहे. तर डे नाईट कसोटी सामना चालू झाल्यानंतर पहिलाच सामना ठरला आहे जो दुसऱ्या दिवशी संपला. यापूर्वी 2018 मध्ये बेंगलोर येथे झालेला अफगाणिस्तान विरुद्धचा सामना हा टीम इंडियाने दुसऱ्याच दिवशी जिंकला होता. तर सगळ्यात अगोदर ऑगस्ट 1882 मध्ये इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना दुसऱ्याच दिवशी जिंकला होता. त्यानंतर 1988 मध्ये झालेल्या तीन सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दोन दिवसात गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. 

याव्यतिरिक्त, 1889 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडला दोन कसोटी सामन्यांमध्ये दुसऱ्याच दिवशी पराभूत केले होते. यानंतर, 1890 मध्ये ओव्हल येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पुन्हा ऑस्ट्रेलियाचा संघाला सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी पराभूत केले होते. तेच 1896 मध्ये दक्षिण आफिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंडच्या संघाला सलग दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून दुसऱ्याच दिवशी हार पत्करावी लागली होती. मात्र गुलाबी चेंडूने डे नाईट कसोटी सामन्याची सुरवात झाल्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला हा पहिलाच सामना आहे जो दुसऱ्याच दिवशी संपला.     

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com