फातोर्ड्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय अर्धशतकाचे मानकरी डीन जोन्स

किशोर पेटकर
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

दिग्गज क्रिकेटपटू आणि विख्यात समालोचक ऑस्ट्रेलियाचे डीन जोन्स यांचे गुरुवारी मुंबईत ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जोन्स यांचे गोव्याशी आगळे नाते आहे.

पणजी:  दिग्गज क्रिकेटपटू आणि विख्यात समालोचक ऑस्ट्रेलियाचे डीन जोन्स यांचे गुरुवारी मुंबईत ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जोन्स यांचे गोव्याशी आगळे नाते आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकाविण्याचा मान त्यांच्या नावे आहे.

गोव्यात झालेला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २५ ऑक्टोबर १९८९ रोजी फातोर्डा येथे झाला. तेव्हा नेहरू कप स्पर्धेच्या साखळी फेरीत तत्कालीन जगज्जेत्या ऑस्ट्रेलियासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. तो सामना ऑस्ट्रेलियाने २८ धावांनी जिंकला, त्याचवेळी बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना श्रीलंकेने दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली होती. 

ॲलन बोर्डर याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डीन जोन्स याच्या शैलीदार ८५ धावांच्या बळावर त्यांनी निर्धारित ५० षटकांत ७ बाद २२२ धावा केल्या. जोन्सने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १०१ चेंडूंतील खेळीत ७ चौकार व २ षटकार मारले होते. 

नंतर श्रीलंकेने २२३ धावांच्या आव्हानासमोर ४७.१ षटकांत सर्व बाद १९४ धावा केल्या. मध्यफळीतील अरविंद डिसिल्वा याने झुंजार फलंदाजी केली, पण संघाला अननुभवाचा फटका बसला. डिसिल्वाने ९६ धावा केल्या. त्याने १०७ चेंडूंत ७ चौकार, ३ षटकार मारले. सायमन ओडोनेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाल्यामुळे डिसिल्वाचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले.

संबंधित बातम्या