गोव्याची डेझी, कॅरेन संभाव्य विश्वकरंडक संघात

किशोर पेटकर
रविवार, 12 जुलै 2020

सध्याच्या नियोजनानुसार, येत्या २० जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गोव्यात मुलींच्या संघाचे शिबिर होणार आहे.

पणजी

आघाडीफळीत खेळणाऱ्या गोव्याच्या डेझी लिसा क्रास्टो व कॅरेन एस्ट्रोसियो यांची १७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. स्पर्धा पुढील फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतातच होईल.

सध्याच्या नियोजनानुसार, येत्या २० जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गोव्यात मुलींच्या संघाचे शिबिर होणार आहे. त्यापूर्वी सर्व खेळाडूंना आयसीएमआरच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत कोविड-१९ चाचणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. संभाव्य संघ शिबिरात एकूण ३५ खेळाडूंची निवड झाली आहे.

गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी डेझी व कॅरेन यांचे अभिनंदन केले आहे. कामगिरीच्या बळावर या दोघीही विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या मुख्य संघात स्थान मिळवतील असा विश्वास चर्चिल यांनी व्यक्त केला आहे. जीएफए महिला फुटबॉल समितीच्या प्रमुख कॅरोल गोम्स यांनीही खेळाडूंचे कौतुक केले आहे.

१७ वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा भारतातील पाच शहरांत पुढील वर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत होईल. स्वीडनचे थॉमस डेनर्बी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. यजमान या नात्याने भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेस पात्र ठरला आहे.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या