दिल्ली कॅपिटल्ससह बंगळूरही प्लेऑफसाठी पात्र

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

पराभूत होऊनही बंगळूर पात्र ठरले. आता क्‍वॉलिफायर-१ मध्ये मुंबई-दिल्ली असा मुकाबला होईल तर बंगळूर तिसऱ्या स्थानी आले आहेत​

अबुधाबी- अखेर आयपीएलला प्लेऑफसाठी पात्र ठरलेले दोन संघ मिळाले. दिल्ली कॅपिटलने बंगळूरचा ६ विकेटने पराभव केला आणि बाद फेरीत प्रवेश केला. पराभूत होऊनही बंगळूर पात्र ठरले. आता क्‍वॉलिफायर-१ मध्ये मुंबई-दिल्ली असा मुकाबला होईल तर बंगळूर तिसऱ्या स्थानी आले आहेत

बंगळूरला १५२ धावांत रोखल्यानंतर दिल्लीने हे आव्हान १९ षटकांत पार केले. शिखर धवन (५४) आणि अजिंक्‍य रहाणे (६०) यांनी दिल्लीचा विजयाचा पाया रचला. हे आव्हान दिल्लीने १७.३ षटकांत पार केले असते तर पराभूत झाल्यानंतर दिल्ली स्पर्धेबाहेर गेले असते. चार पराभवानंतर दिल्लीने हा विजय मिळवला.

दिल्लीने आज आक्रमणाची दिशा बदलली. प्रथमच संधी देण्यात आलेला डॅनियनल सॅम्स आणि अश्‍विन यांच्याद्वारे आक्रमण सुरू केले, पण पहिले यश मिळवून दिले ते रबाडाने. त्यानंतर मात्र अश्‍विनने विराट कोहलीची विकेट मिळवून दिल्लीला पकड मिळवून देण्यास सुरुवात केली.

फॉर्मात असलेल्या देवदत्त पदिक्कलने आणखी एक अर्धशतक केले मात्र त्यानंतर त्याला लगेचच नॉर्कियाने बाद केले. एबी डिव्हिल्यर्सचा तडाखा ३५ धावांर्यंत मर्यादित राहिल्यामुळे बंगळूरचीही धावसंख्या मर्यादित रहाणार हे निश्‍चित झाले. 
 

संबंधित बातम्या