गोमंतकीय फुटबॉलपटूंना आयएसएलमध्ये मागणी

गोमंतकीय फुटबॉलपटूंना आयएसएलमध्ये मागणी
george-dsouza

पणजी,

 इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गोमंतकीय फुटबॉलपटूंना मागणी आहे. करारबद्ध खेळाडूंत आता स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचा बचावपटू जॉर्ज डिसोझा याची भर पडली आहे.

आयएसएल स्पर्धेतील विविध क्लबनी आतापर्यंत १९ गोमंतकीय फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. जॉर्ज डिसोझा हे त्यापैकी एकदम नवे नाव आहे.

कळंगुटच्या २६ वर्षीय लेफ्ट-बॅक खेळाडूस नव्या आयएसएल मोसमासाठी ओडिशा एफसी संघाने करारबद्ध केले आहे. त्याचा हा नवा करार दोन वर्षांचा आहे. येत्या १ जूनपासून तो ओडिशा एफसी संघात रुजू होईल. बचावफळीत खेळणारा जॉर्ज डाव्या पायाच्या सणसणीत फ्रीकिक फटक्यांसाठी परिचित आहे. त्याच्या फुटबॉलची सुरवात २०१० मध्ये सेझा फुटबॉल अकादमीतून झाली. त्यानंतर त्याने गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुट असोसिएशनचे प्रतिनिधित्व केले. या संघातून खेळताना चमकदार खेळ केलेल्या जॉर्जने नंतर स्पोर्टिंग क्लबला आकर्षित केले. २०१६-१७ मोसमापासून तो स्पोर्टिंग क्लब संघात आहे. गतमोसमातील प्रो-लीग स्पर्धेत त्याने स्पोर्टिंगचे खेळलेल्या सर्व २० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. जॉर्जने यंदाच्या प्रो-लीग स्पर्धेत चार गोलही नोंदविले आहेत, तसेच सहा असिस्टही नोंदविले.

जॉर्जने गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत २०१६-१७ मोसमात उपविजेता ठरलेल्या गोव्याच्या संघात जॉर्जचा समावेश होता. २०१४ साली गोव्यात झालेल्या लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेत फुटबॉलचे सुवर्णपदक जिंकलेल्या गोवा-भारत संघाचेही त्याने प्रतिनिधित्व केले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com