आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना सरावासाठी वानखेडे स्टेडियम खुले करण्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

भारतीय कर्णधार विराट कोहलीही सध्या मुंबईत आहे. त्याने यापूर्वी मुंबई क्रिकेट संघटनेच्या सुविधांचा वापर सरावासाठी केला आहे.

मुंबई: आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मुंबईतील क्रिकेटपटूंना सरावासाठी वानखेडे स्टेडियम खुले करण्यात यावी, अशी मागणी मुंबई क्रिकेट संघटनेकडे खेळाडूंनी केली आहे. त्याचबरोबर याच स्वरूपाची विनंती मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी परिषदेतील सदस्य नदीम मेमन आणि किरण पोवार यांनी केली आहे.

 

अजिंक्‍य रहाणेने यापूर्वी याच स्वरूपाची तोंडी विनंती केली होती. रहाणेप्रमाणेच रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, आदित्य तरे, सूर्यकुमार यादव हे मुंबईकर खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीही सध्या मुंबईत आहे. त्याने यापूर्वी मुंबई क्रिकेट संघटनेच्या सुविधांचा वापर सरावासाठी केला आहे.

 

मुंबई क्रिकेट संघटनेने पुन्हा एकदा सरावासाठी परवानगी मागितली आहे. आता त्याचबरोबर भारतीय क्रिकेट मंडळाने सरावासाठी तयार केलेल्या नियमावलींच्या प्रतीसह परवानगी मागितली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबईत सरावासाठी तीन सुविधा आहेत. वानखेडे स्टेडियमसह वांद्रे येथील शरद पवार इनडोअर अकादमी तसेच एमसीए कांदिवली क्‍लबही आहे. महाराष्ट्र सरकारने क्रिकेटच्या सरावास मंजुरी दिली नसली तरी अनेक राज्य सरकारनी खेळाडूंच्या सरावास हिरवा कंदील दाखवला आहे.

 

सर्वसामान्य नागरिकांना जॉगिंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. क्रिकेटपटूंना मैदानात हेच करण्यास मंजुरी देता येईल, अशी सूचना नदीम मेमन यांनी केली आहे. मुंबईतील वरिष्ठ क्रिकेटपटूंनी वांद्रे येथील इनडोअर अकादमीत तीन किंवा पाचच्या गटाने सराव करायला परवानगी द्यायला हवी, अशी विनंती पोवार यांनी केली आहे.

 

क्रिकेट सुधार समितीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब

मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी परिषदेची शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीत क्रिकेट सुधार समितीवर शिक्कामोर्तब करण्यात येण्याची शक्‍यता आहे. लालचंद राजपूत, राजू कुलकर्णी आणि समीर दिघे यांचा समावेश क्रिकेट सुधार समितीत करण्याचा निर्णय कार्यकारी परिषदेने घेतला होता. मुंबई क्रिकेट संघटनेने स्कोअरर दीपक जोशी यांनी निवृत्ती स्कोअररना साह्य करण्याची विनंती करतानाच सर्व स्कोअररचा ग्रुप विमा काढण्याची विनंती केली होती. मुंबईतील स्कोअरर रमेश परब यांच्यावर कोरोनामुळे उपचार करावे लागले होते. त्यानंतर जोशी यांनी या प्रश्‍नाकडे पुन्हा लक्ष वेधले आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या