स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षकांना ‘आयएसएल’मध्ये मागणी

क्रीडा प्रतिनिधी
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

स्पेनमधील फुटबॉल प्रशिक्षकांना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मोठी मागणी आहे. आगामी मोसमातील स्पर्धेत दहापैकी सात संघांचे मार्गदर्शक स्पॅनिश आहेत. 

पणजी: स्पेनमधील फुटबॉल प्रशिक्षकांना इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत मोठी मागणी आहे. आगामी मोसमातील स्पर्धेत दहापैकी सात संघांचे मार्गदर्शक स्पॅनिश आहेत. 

आयएसएल स्पर्धेच्या सातव्या मोसमास या वर्षी नोव्हेंबरमध्ये बंद दरवाज्याआड गोव्यात सुरवात होईल. त्यापूर्वी सध्या संघ बांधणीवर भर दिला जात असून सर्व संघांनी आपापली प्रशिक्षक नियुक्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे. हैदराबाद एफसीचे स्पॅनिश प्रशिक्षक आल्बट रोका यांनी प्रसिद्धी बार्सिलोना एफसी संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर, रिक्त झालेल्या जागी स्पेनमधील बार्सिलोना येथील मान्युएल (मानोलो) मार्किझ यांची नियुक्ती झाली आहे. ते ५१ वर्षांचे आहेत. यापूर्वी स्पेनमधील ला-लिगा आणि क्रोएशियातील संघांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.

भारतात प्रथमच मार्गदर्शन
चेन्नईयीनचे साबा लाझ्लो, एफसी गोवाचे ह्वआन फेरॅन्डो, नॉर्थईस्टचे जेरार्ड नस, हैदराबादचे मान्युएल मार्किझ व ओडिशा एफसीचे स्टुअर्ट बॅक्स्टर आगामी मोसमापासून भारतात प्रशिक्षक या नात्याने पदार्पण करतील. इतरांनी यापूर्वी आयएसएल स्पर्धेेत प्रशिक्षकपद भूषविले आहे. 

सर्वांत तरुण आणि वयस्क
आयएसएल स्पर्धेतील सात संघांचे प्रशिक्षक स्पॅनिश आहेत. हैदराबादचे मानोलो यांच्याव्यतिक्त स्पॅनिश प्रशिक्षकांत बंगळूर एफसीचे ५१ वर्षीय कार्ल्स कुआद्रात, एफसी गोवाचे ३९ वर्षीय ह्वआन फेरॅन्डो, केरळा ब्लास्टर्सचे ४८ वर्षीय किबु विकुना, एटीके-मोहन बागानचे ६३ वर्षीय अंतोनियो लोपेझ हबास, मुंबई सिटीचे ४३ वर्षीय सर्जिओ लोबेरा, नॉर्थईस्ट युनायटेडचे ३५ वर्षीय जेरार्ड नस यांचा समावेश आहे. नस हे यंदाच्या आयएसएलमधील सर्वांत तरुण प्रशिक्षक आहेत. चेन्नईयीन एफसीचे रुमानियात जन्मलेले ५६ वर्षीय साबा लाझ्लो हे हंगेरीचे, जमशेदपूर एफसीचे ५४ वर्षीय ओवेन कॉईल हे स्कॉटलंडचे, तर ओडिशा एफसीचे ६७ वर्षीय स्टुअर्ट बॅक्स्टर हे इंग्लंडमधील आहेत. बॅक्स्टर यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील सर्वांत वयस्क प्रशिक्षक असतील.

हबास यशस्वी
एटीके-मोहन बागानचे प्रशिक्षक हबास हे आयएसएलमधील दीर्घानुभवी आणि यशस्वी मार्गदर्शक आहेत. २०१४ व २०१५, नंतर २०१९-२० मोसमात त्यांनी कोलकात्यातील एटीके  संघाला मार्गदर्शन केले. २०१४ व २०१९-२० मध्ये एटीके संघ आयएसएल विजेता बनला. आयएसएल करंडक सर्वाधिक दोन वेळा जिंकणारे ते एकमेव प्रशिक्षक आहेत. याशिवाय हबास यांनी २०१६-१७ मोसमात पुणे सिटी संघालाही मार्गदर्शन केले. बंगळूरचे २०१६-१७ कालावधीत ते आयएसएलमध्ये आल्बर्ट रोका यांचे सहाय्यक होते, नंतर २०१८ मध्ये त्यांची बंगळूरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. २०१८-१९ मोसमात बंगळूरने आयएसएल करंडक जिंकला. सर्जिओ लोबेरा यांनी २०१७ ते २०२० या कालावधीत एफसी गोवाचे प्रशिक्षकपद भूषविले.

संबंधित बातम्या