डेस्मनच्या गोलमुळे धेंपो क्लब विजयी; प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये वास्कोवर निसटती मात

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

धेंपो क्लबला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून देणारा गोल डेस्मनने 77व्या मिनिटास केला.

पणजी: डेस्मन परेरा याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत निसटता विजय नोंदविला. माजी विजेत्या वास्को स्पोर्टस क्लबला 1-0 फरकाने हरविले. सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

धेंपो क्लबला विजयाचे पूर्ण तीन गुण मिळवून देणारा गोल डेस्मनने 77व्या मिनिटास केला. धेंपो क्लबच्या सूरज हडकोणकर याचा क्रॉस पास वास्को क्लबचा गोलरक्षक रिझ्वन फर्नांडिस व्यवस्थित अडवू शकला नाही, त्याचा फायदा उठवत डेस्मनने अचूक हेंडिग साधले. धेंपो क्लबचा हा नऊ सामन्यातील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता 17 गुण झाले आहेत. वास्को क्लबला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे नऊ लढतीनंतर 13 गुण कायम राहिले. (Dhempo Club wins by Desmans goal Overcoming Vasco in professional league football)

Goa Professional League : यूथ क्लब मनोराची विजयी चमक; वेळसाव क्लबवर एका गोलने...

धेंपो क्लबने सामन्यावर वर्चस्व राखले, पण त्यांना संधी साधता आली नाही. त्यामुळे आघाडीसाठी प्रतीक्षा करावी लागली. पूर्वार्धात 25व्या मिनिटास उत्तम रायने फटका मारताना चुकीचा नेम साधल्यामुळे धेंपो क्लबला आघाडी मिळू शकली नाही. त्यानंतर वास्को क्लबचा गोलरक्षक दक्ष राहिल्याने उत्तमची आणखी संधी वाया गेली. विश्रांतीस एक मिनिट बाकी असताना एल्सन फर्नांडिस अगदी जवळून अचूक फटका मारू शकला नाही, त्यामुळे वास्को क्लबच्या खाती गोल जमा होऊ शकला नाही. 

उत्तरार्धात दोन वेळा वास्कोचा गोलरक्षक रिझ्वन याने भक्कम कामगिरी प्रदर्शित केल्यामुळे धेंपो क्लबला गोल नोंदविता आला नाही. सूरज हडकोणकरचा फ्रीकिक फटका, तसेच अरिस्टन कॉस्ताचा फटका रिझ्वनने फोल ठरविला. 

संबंधित बातम्या