धेंपो क्लबची विजयी चमक रिचर्ड व गौरवच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सवर मात

धेंपो क्लबची विजयी चमक  रिचर्ड व गौरवच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सवर मात
Dhempo Clubs victorious spark Richard and Gauravs goal beat Churchill Brothers

पणजी : सामन्याच्या पूर्वार्धात रिचर्ड कार्दोझ व गौरव वायगणकर यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर शनिवारी धेंपो स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. त्यांनी चर्चिल ब्रदर्सला 2-0 फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. धेंपो क्लबचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला, तर प्रथमच त्यांनी क्लीन शीट राखली. खेळाडूंच्या दुखापतीचा फटका बसलेल्या धेंपो क्लबने शनिवारी विजय निसटू दिला नाही.

धेंपो क्लबचा पहिला गोल प्रेक्षणीय ठरला. सामन्याच्या सहाव्या मिनिटास रिचर्डने 35 यार्डवरून मारलेल्या झणझणीत फटक्यावर चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक देबनाथ मंडल पूर्णपणे हतबल ठरला. नंतर 40व्या मिनिटास शालम पिरीसच्या असिस्टवर गौरवने सुरेख हेडिंग साधत धेंपो क्लबला दोन गोलची आघाडी मिळवून दिली. स्पर्धेत रविवारी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब व वास्को स्पोर्टस क्लब यांच्यातील सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर खेळला जाईल.

कोविड बाधितामुळे सामना पुन्हा लांबणीवर

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचा एक खेळाडू कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणीत बाधित आढळला होता, त्यामुळे या संघाचा सलग दुसरा सामना गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे सोमवारी स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि पणजी फुटबॉलर्स यांच्यातील सामना खेळला जाणार नाही.

जीएफएने दिलेल्या माहितीनुसार, अगोदर चाचणीत बाधित सापडलेला खेळाडू विलगीकरणात आहे. सराव सत्रात त्याच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडूंचेही विलगीकरण करण्यात आल्याने स्पोर्टिंग क्लब संघाचा सलग दुसरा सामना रद्द करण्यात आला आहे. स्पर्धेचे बाकी वेळापत्रक नियोजनाप्रमाणे असेल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com