Goa Professional League : धेंपो स्पोर्टस क्लबचा पणजी फुटबॉलर्स संघावर विजय

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 4 मार्च 2021

बीव्हन डिमेलोच्या शानदार दोन गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने पिछाडीवरून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चमकदार  विजयाची नोंद केली.

पणजी : बीव्हन डिमेलोच्या शानदार दोन गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने पिछाडीवरून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चमकदार  विजयाची नोंद केली. त्यांनी पणजी फुटबॉलर्सला 3 - 1 फरकाने नमविले. सामना गुरुवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या 45 व्या मिनिटास पणजी फुटबॉलर्सला लॉईड कार्दोझ याने आघाडी मिळवून दिली होती. मात्र उत्तरार्धात बीव्हनच्या धडाक्यामुळे धेंपो क्लबने मुसंडी मारली. बीव्हनने दोन मिनिटांत दोन गोल नोंदवून धेंपो क्लबला 2 - 1 अशी आघाडी मिळवून दिली. त्याने अनुक्रमे 56 व 58 व्या मिनिटास चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली. अन्य एक गोल 73व्या मिनिटास बदली खेळाडू पेद्रू गोन्साल्विस याने केला. 

ISL 2020-21: आयएसएल`च्या प्ले-ऑफ लढतीत मुंबई सिटीचे पारडे जड

सामन्याच्या 44 व्या मिनिटास बीव्हनचा प्रयत्न हुकल्यानंतर प्रतिहल्ल्यावर पणजी फुटबॉलर्सने गोल केला. वाल्मिकी मिरांडाच्या असिस्टवर लॉईडने धेंपो क्लबचा गोलरक्षक मेलरॉय फर्नांडिसचा बचाव भेदला. रिचर्ड कॉस्ताच्या असिस्टवर बीव्हनने विश्रांतीनंतरच्या अकराव्या मिनिटास धेंपो क्लबसाठी बरोबरीचा गोल केला. त्यानंतर बीव्हनने रिबाऊंड फटक्यावर चेंडूला अचूक दिशा दाखविली. पेद्रूने नंतर सेटपिसेसवर संघाची आघाडी मजबूत केली. पणजी फुटबॉलर्सच्या लिस्टन कार्दोझने बीव्हनला पाडल्यानंतर मिळालेल्या फ्रीकिकवर पेद्रूने सणसणीत फटका मारत चेंडूला थेट नेटची दिशा दाखविली. 

 

आणखी तिघे खेळाडू कोविड बाधित

गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या संघांचे खेळाडू कोरोना विषाणू बाधित ठरण्याची मालिका कायम आहे. कोविड-19 आरटी-पीसीआर चाचणीत आणखी दोघे फुटबॉलपटू बाधित आढळल्यामुळे गोवा फुटबॉल असोसिएशनने एफसी गोवा आणि गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब यांच्यातील सामना लांबणीवर टाकला आहे. हा सामना शुक्रवारी (ता. 5) म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होणार होता. बाधित खेळाडू व त्यांच्या संपर्कातील खेळाडूंच्या विलगीकरणानंतर सामना खेळला जाईल. बाधित खेेळाडू कोणत्या संघातील हे संघटनेने जाहीर केलेले नाही. स्पर्धा सुरू असताना आतापर्यंत कोविड बाधित ठरलेल्या एकूण खेळाडूंची संख्या पाच झाली आहे.
 

संबंधित बातम्या