फुटबॉल शिबिरासाठी राज्य सरकारशी चर्चा

फुटबॉल शिबिरासाठी राज्य सरकारशी चर्चा
Kushal Das

पणजी

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आपल्या विविध संघासाठी शिबिरे सुरू लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नरत आहे, त्या दृष्टीने वेगवेगळ्या राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती महासंघाचे सचिव कुशल दास यांनी दिली.
कुशल दास यांनी ‘एआयएफएफ टीव्ही’शी संवाद साधताना, १६ वर्षांखालील मुलगे आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघासाठी शिबिराची गरज प्रतिपादली. ‘‘एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धा सुमारे तीन महिने दूर आहे, त्यामुळे १६ वर्षांखालील मुलांच्या शिबिरास प्रथम प्राधान्य असेल. १७ वर्षांखालील मुलींचे शिबिरही लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक असल्याची आम्हाला जाणीव आहे,’’ असे दास यांनी नमूद केले. नोव्हेंबरमध्ये बहारीन येथे होणाऱ्या एएफसी १६ वर्षांखालील स्पर्धेत भारताचे मुलगे खेळणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या विश्वकरंडक स्पर्धेत यजमान संघाचा सहभाग असेल.
शिबिरे सुरू करण्याच्या उद्देशाने महासंघ वेगवेगळ्या राज्य सरकारशी, तसेच साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) यांच्याशी चर्चा करत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. ‘‘कोविड-१९ महामारी परिस्थितीशी लढा देताना प्रत्येक सरकारचे पालन करण्यासाठी शिष्टाचार आहेत. आशा आहे, की दोन्ही शिबिरे आम्ही लवकरच सुरू करू, त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहे,’’ असे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सचिवांनी स्पष्ट केले. काही राज्य सरकारचे शिष्टाचार खूपच कठोर असल्याने त्या कारणास्तव शिबिर दुसऱ्या राज्यात हलविणे भाग पडू शकते, अशी माहिती दास यांनी दिली.
‘‘ही अतिशय अवघड परिस्थिती असली, तरी परिस्थितीनुसार आम्हाला सर्वोत्तम उपाय शोधावा लागेल,’’ असे दास म्हणाले. सध्याची परिस्थिती सर्वांसाठी अतिशय निराशाजनक असल्याचे सांगून सारे नियोजन खंडित झाल्याबद्दल दास यांनी खंत व्यक्त केली.

सीनियर शिबिर सप्टेंबरमध्ये
भारताच्या सीनियर राष्ट्रीय फुटबॉल संघाचे शिबिर सप्टेंबरमध्ये ओडिशातील भुवनेश्वर येथे घेण्यास महासंघ उत्सुक असल्याचेही दास यांनी नमूद केले. विश्वकरंडक पात्रता फेरीतील सामना भारतीय संघ कतारविरुद्ध भुवनेश्वर येथे ८ ऑक्टोबरला खेळणार आहे. त्यादृष्टीने महासंघ ओडिशा सरकार आणि साई यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा असल्याचे दास यांनी सांगितले.

संपादन - अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com