दिल्लीतील प्रदूषित हवा अर्धमॅरेथॉनच्या स्पर्धकांसाठी घातक ठरेल ; डॉक्टरांचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

दिल्लीत रविवारी होणारी अर्धमॅरेथॉन ही स्पर्धकांसाठी आत्मघातकी ठरेल असा इशारा राजधानीतील डॉक्‍टर देत आहेत. कोरोनाचे आक्रमण तसेच हवा प्रदूषीत असल्याचा फटका स्पर्धकांना बसेल, असे डॉक्‍टरांचे मत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत रविवारी होणारी अर्धमॅरेथॉन ही स्पर्धकांसाठी आत्मघातकी ठरेल असा इशारा राजधानीतील डॉक्‍टर देत आहेत. कोरोनाचे आक्रमण तसेच हवा प्रदूषीत असल्याचा फटका स्पर्धकांना बसेल, असे डॉक्‍टरांचे मत आहे.

मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रम नोंदवलेली ब्रिगीद कॉस्गेई (केनिया), दोन वेळचा विजेता अँदामॅलाक बेलिहू (इथिओपिया) यांच्यासह ४९ अव्वल ॲथलीटचा या २१ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत सहभाग असेल. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवरील ही स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

नवी दिल्लीतील एकूण कोरोना रुग्ण पाच लाखापेक्षा जास्त आहेत. हवा कमालीची प्रदूषित आहे. या परिस्थितीत या स्पर्धेतील सहभाग आत्मघातकीच ठरेल, असे लुंग केअर फौंडेशनचे संस्थापक विश्वस्त अरविंद कुमार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय ॲथलीट असा किंवा गावातील लहान मुलगा प्रदूषणाचा धोका सर्वांना सारखाच असतो असे त्यांनी सांगितले.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनीही शर्यतीसाठी सध्याचे वातावरण योग्य नसल्याचे सांगितले. वाढत्या प्रदूषणामुळे सध्या खुल्या वातावरणात कसरतीही करणे योग्य नव्हे. यामुळे फुफ्फुसाचे विकार होऊ शकतात. आघाडीच्या धावपटूंवरही याचा परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.

 

अधिक वाचा :

काल सुधारलेली दिल्लीतील हवेची गुणवत्ता आज पुन्हा खराब 

जानेवारीपासून रंगणार गोवा प्रो-लीग फुटबॉल

ऐतिहासिक कोलकाता डर्बीत एटीके मोहन बागानचे वर्चस्व

 

संबंधित बातम्या