परदेशी खेळाडू नियमाची घाई नको : बेदिया

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

आयएसएलचा यंदा सातवा मोसम आहे आणि ही अजूनही नवोदित स्पर्धा आहे. आयएसएलमध्ये ३+१ परदेशी खेळाडू नियम लागू करणे खूप लवकर होईल असे वाटते.

पणजी

भारतातील फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या संघातील परदेशी खेळाडूंची संख्या कमी करणारा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा नवा नियम एफसी गोवाचा अनुभवी स्पॅनिश मध्यरक्षक एदू बेदिया याला सध्या तरी पसंत पडलेला नाही. नियम लागू करण्याची घाई होत असल्याचे त्याला वाटते.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ३+१ परदेशी खेळाडूंच्या नियमास या ३१ वर्षीय फुटबॉलपटूने पाठिंबा दर्शविलेला नाही. हा नवा नियम इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलमध्ये २०२१-२२ मोसमापासून प्रत्यक्षात येईल. त्यानुसार एका आशियाई खेळाडूसह भारतीय क्लब चार परदेशी खेळाडू करारबद्ध करू शकतील. हा नियम आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. सध्या आयएसएल क्लब सात परदेशी फुटबॉलपटूंना करारबद्ध करू शकतात. यंदा बेदिया एफसी गोवाकडून सलग चौथा आयएसएल मोसम खेळेल. तो २०१७-१८ पासून एफसी गोवा संघात आहे. त्याचा करार २०२१-२२ पर्यंत आहे.

परदेशी फुटबॉलपटूंच्या नियमासंदर्भात एदू बेदिया याने प्रसिद्धी माध्यमांना सांगितले, की आयएसएलचा यंदा सातवा मोसम आहे आणि ही अजूनही नवोदित स्पर्धा आहे. आयएसएलमध्ये ३+१ परदेशी खेळाडू नियम लागू करणे खूप लवकर होईल असे वाटते. कारण परदेशी खेळाडूंमुळे दर्जा उंचावतोच, शिवाय भारतीय खेळाडूंना प्रगतीसाठी मदत होते. भारतीय खेळाडूंना शिकवण्याच्या प्रक्रियेमुळेच संघांचे मुख्य प्रशिक्षक परदेशी आहेत. परदेशी खेळाडूंच्या नव्या नियमाच्या अंमलबजावणीची घाई करू नये, आम्हाला टप्प्याटप्प्याने जावे लागेल, कारण परदेशी खेळाडू भारतीय खेळाडूंना सुधारणा साधण्यास मदत करतात.

ग्रासरूट फुटबॉलवर भर हवा

भारतात ग्रासरूट फुटबॉलवर भर आवश्यक असल्याची बाब बेदिया याने अधोरेखित केली. त्याने सांगितले, की ‘‘मी जेव्हा अकादमीत रुजू झालो, तेव्हा पाच वर्षांचा होतो. त्यावेळीच मैदानावरील जागेवर खेळण्याविषयी रणनीती आणि तांत्रिक बाबी शिकविण्यात आले. एफसी गोवात १४व्या वर्षी खेळाडू अकादमीत जोडला जातो, तरीही ते व्यावसायिक पातळीवर पोहचतात त्याबद्दल त्यांना श्रेय द्यावे लागेल, पण युरोपात हे खूप लहान वयात होते.’’ भारतीय फुटबॉलविषयी बेदियाने स्पष्ट केले, की भारतात तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार खेळाडू आहेत, मात्र त्यांना रणनीतिकदृष्ट्या सुधारणा आवश्यक आहे.

नवे प्रशिक्षक फेरॅन्डो यांना पाठिंबा

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात साखळी फेरीतील काही सामने बाकी असताना स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांना डच्चू देण्यात आला होता, त्या निर्णयाने आपण आश्चर्यचकीत झाल्याची कबुली बेदिया याने दिली आहे. आता नवे प्रशिक्षक ह्वआन फेरॅन्डो यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसएल स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट या मध्यरक्षकाने बाळगले आहे. फेरॅन्डो यांचे फुटबॉल तत्वज्ञान एफसी गोवाशी जुळणारे असल्याचा दावा बेदियाने केला आहे.

 

संबंधित बातम्या